नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. इस्त्रायली सैन्य गाझामधील हमासच्या स्थानांना लक्ष्य करत आहे. यामुळे नागरिकांनाही मोठी हानी पोहचली आहे. दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत आंतरराष्ट्रीय मंचांवर सातत्याने टीका होत आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेनमधील युद्धातून जग सावरू शकले नाही, तर दुसरीकडे हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू झाले. दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांच्याशी चर्चा केली आहे. चर्चेदरम्यान गाझा, लेबनॉनमधील सद्यस्थिती आणि या भागातील सागरी वाहतुकीच्या सुरक्षेवर चर्चा झाली. यावेळी परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, आम्ही संपर्कात राहू. एस जयशंकर यांनी सोशल मीडियावर संभाषणाशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे.
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये सुमारे १८,००० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. युनायटेड नेशन्सचा अंदाज आहे की गाझाच्या २.४ दशलक्ष लोकांपैकी १.९ दशलक्ष लोक त्यांच्या घरातून विस्थापित झाले आहेत, त्यापैकी निम्मी मुले आहेत. हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्ध सुरू होऊन ६५ दिवस उलटले आहेत, मात्र सध्या तरी युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. सोमवारी समोर आलेल्या इस्रायली मीडियाच्या वृत्तानुसार, दक्षिण गाझा पट्टीमध्ये झालेल्या लढाईत इस्रायली लष्कराचे आणखी तीन सैनिक मरण पावले आहेत. यामुळे हमासविरुद्धच्या जमिनीवरील हल्ल्यात मारल्या गेलेल्या सैनिकांची संख्या १०४ वर पोहोचली आहे.