परभणी : सद्य स्थितीत नांदेड-बेंगलूरू-नांदेड दररोज धावणा-या एक्सप्रेस रेल्वेत नांदेड येथून रायचूर पर्यंत जनरल तिकीटचे लोकल प्रवासी वगळता रायचूर पर्यंत ५० टक्के पेक्षा जास्त रिकामी धावत आहे. परंतू याकडे दमरे रेल्वे अधिकारी यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रेल्वेचा विस्तार नागपूर पर्यंत केल्यास मराठवाड्यातून नागपुरला जाणा-या प्रवाशांना सोयीचे ठरणार असून सदर रेल्वे जनप्रिय श्रेणीत येणार आहे.
विभागातील एखाद्या विशेष रेल्वेला ५० टक्के पेक्षा जास्तीचा प्रतिसाद मिळाल्यावर देखील प्रवाशांचा प्रतिसाद नाही असा बहाणा पुढे करून सदरील रेल्वे रद्द करण्याचा कट केला जातो. नांदेड-बेंगलूरू रेल्वेला नागपूर पर्यंत विस्तारून नागपूर-बेंगलूरू दरम्यान चालविल्यास मराठवाडा येथील प्रवाशांना नागपूर शहराला जोडणारा दैनंदिन एक्सप्रेस मिळणार आहे. सोबत सदर रेल्वेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यास सदर रेल्वे जनप्रिय श्रेणीत येणार आहे.
मराठवाडा विभागातून शंभर पेक्षा जास्त एसटी, खासगी ट्रॅवेल्स धावत असताना मुद्दामहून मराठवाडा ते नागपूर दरम्यानचा रेल्वेने संपर्क तोडून हम करे सो कायदा प्रमाणे दक्षिण-मध्य रेल्वे विभागातील निगरगट्ट अधिकारी मिरवत आहेत. हे थांबलेच पाहिजे आणि नांदेड-बेंगलूरू रेल्वेला नागपूर पर्यंत वाढवून सदर रेल्वेला नागपूर येथून चालविण्यात यावे.
तसेच अनेक वर्षांपासून विभागातील प्रवाशांची प्रलंबित मागणी असणा-या छ. संभाजीनगर- नागपूर दरम्यान नवीन दैनंदिन एक्सप्रेस रेल्वेसोबत छ. संभाजीनगर-अकोला दरम्यान नवीन दैनंदिन इंटरसिटी एक्सप्रेस व पूर्वी प्रमाणे सोलापूर-नागपूर एक्सप्रेस चालविण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, बाळासाहेब देशमुख, डॉ. राजगोपाल कालानी, श्रीकांत गडप्पा, रुस्तम कदम, खदीर लाला हाशमी, रवींद्र मूथा, श्रीकांत अंबोरे इत्यादीने केली आहे.