जिंतूर : शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयास संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमास नॅशनल बोर्ड ऑफ अँकिडिटेशन (एनबीए) चे सर्वोच्च मानांकन नुकतेच प्राप्त झाले आहे. हे मानांकन ३ वर्षांसाठी असणार आहे. त्यामुळे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
जिंतूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला मागील काही वर्षांपासून घरघर लागली होती. यामध्ये दोन शाखा बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला होता. परिणामी प्राचार्य व प्राध्यापकांचा उदासीनतेमुळे तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसर भकास अवस्थेत होता. मात्र काही दिवसांपूर्वी शहरातील सामाजिक संघटना व पत्रकारांनी विषय लावून धरल्यामुळे तंत्रनिकेतनला प्रभारी प्राचार्य म्हणून डॉ. पाचकोर यांनी पदभार स्वीकारला. दरम्यान महाविद्यालयाची झालेली दुरवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले.
यावेळी महाविद्यालयातील मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्या दुरुस्त करणे, अंतर्गत सिमेंट रस्ते बनवणे, स्वच्छतागृह नूतनीकरण, विद्यार्थ्यांचे वसतिगृह व प्रयोगशाळा, कार्यालय, ग्रंथालय अद्यावत केली होती. दरम्यान एनबीएकडे मानांकणासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. समितीने ३ दिवस तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा आढावा घेऊन संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमास नॅशनल बोर्ड ऑफ अँकिडिटेशन २०२६ पर्यंत ३ वर्षाचे राष्ट्रीय मानांकन प्रदान केले आहे. जिल्ह्यातील एकमेव जिंतूर येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयास मानांकन मिळाल्यामुळे त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यामुळे शहरातील नागरिकांकडून प्राचार्यांसह सर्व प्राध्यापक व कर्मचा-यांचे स्वागत करण्यात येत आहे.
दरम्यान शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विविध शाखेतील रिक्त पदे असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. त्यामुळे रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी होत आहे.
बंद पडलेल्या दोन शाखा सुरू होणार
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक व इंस्ट्रुमेंटेशन शाखा कर्मचारी अभावी बंद आहेत. आगामी काही दिवसात दोन्ही शाखा पूर्वरत चालू करण्यात येणार असल्याचे प्राचार्य डॉ. आर. टी. पाचकोर यांनी सांगितले.