जिंतूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्वत:च्या फेसबुक पेजवर सम्राट बळीराजाच्या डोक्यावर वामनाने पाय दिल्याचा फोटो टाकला असल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा. तसेच पदाचा दुरुपयोग करून जाब विचारणा-या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असल्यामुळे त्यांच्यावर बडतर्फीची कार्यवाही करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि. १२ डिसेंबर रोजी तहसीलदार मार्फत राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी दि.१४ नोव्हेंबर रोजी फेसबुक या सोशल माध्यमावर बळीराजाच्या मस्तकावर वामन पाय देऊन उभे असल्याचे काल्पनिक चित्र प्रसारित केले. यामुळे तमाम शेतकरी वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे तसेच अशा अवैज्ञानिक व्यक्तीला संवैधानीक पदावर बसण्याचा देखील अधिकार नाही. कारवाई टाळण्यासाठी चाकणकर आपल्या पदाचा गैरवापर करुन जाब विचारणा-या सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत. प्रशासनाने चाकणकर यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन तसेच त्यांची पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत राज्यपाल यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर, जिल्हाध्यक्ष माजी सैनिक बालाजी शिंदे, बाळासाहेब काजळे, रामप्रसाद काजळे, अनिल दाभाडे, सखाराम शेळके, शरद ठोंबरे, अनिल गाडेकर, उद्धव काजळे, निवृत्ती जगताप, दत्ता काकडे, सुदर्शन ताठे आदींच्या सह्या आहेत.