27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणासाठी आरक्षण टक्केवारी वाढवण्याबाबत विचार करावा लागेल

मराठा आरक्षणासाठी आरक्षण टक्केवारी वाढवण्याबाबत विचार करावा लागेल

नागपूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी बिहारच्या धर्तीवर आरक्षणाची मर्यादा वाढवावी, हे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगत, या बाबत विचार होऊ शकेल, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. जुन्या पेन्शन योजनेबाबत आपल्या आधीच्या भूमिकेत बदल करताना त्या योजनेस पुनर्जीवित करण्यालाही अजित पवार यांनी अनुकूलता दर्शवली. नवाब मलिक यांच्या वरून महायुतीत कोणताही तणाव नसल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या पत्रकारांशी अजित पवार यांनी ‘सुयोग’ येथे अनौपचारिक संवाद साधला. त्या वेळी त्यांनी सद्य राजकीय परिस्थिती, भाजपासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय, माजी मंत्री नवाब मलिक यांच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले पत्र आणि जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या विविध मुद्यांवर आपली भूमिका मांडली. मराठा आरक्षणाबद्दल बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाबत सर्वपक्षीय बैठक घेतली तेंव्हा सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, अशी भूमिका मांडली. ओबीसी समजाच्या आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण नको ही भूमिका छगन भुजबळ नेहमीच मांडत आले आहेत. बिहारप्रमाणे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेता येईल, असे माझे व्यक्तिगत मत आहे. तसा ठराव केला तर त्याला सर्वच पक्षांचा पाठिंबा मिळेल यातही शंका नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी आक्रमक आहेत. जुनी पेन्शन योजना सुरू केली तर राज्य सरकारवर मोठा बोजा येईल, राज्य गाळात जाईल हेही खरे आहे. मीही अर्थमंत्री या नात्याने विधिमंडळात मतं व्यक्त केली होती; पण नंतर चर्चा केल्यानंतर आमच्याही लक्षात आले की, कर्मचा-यांना सरसकट पेन्शन न देणे हा अन्याय होईल मात्र अर्थकारणाचा विचार करावा लागेल. त्यासाठी आम्ही तीन अनुभवी सचिवांची जी समिती नेमलेली होती त्यांचा या बाबतचा अहवाल आला आहे. मी देवेंद्रजी व मुख्यमंत्र्यांसोबत प्राथमिक चर्चा केली आहे. कर्मचा-यांना आम्ही मुळीच वा-यावर सोडणार नाही. केंद्र सरकारही पेन्शन योजनेसंबंधी पुनर्विचार करीत असून पुढच्या निवडणुकीच्या आधी केंद्राचेही या बाबतचे धोरण जाहीर होईल, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.

निवडून येण्याची क्षमता हाच निकष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिस-यांदा पंतप्रधान करायचे आहे त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जागा महायुतीसाठी महत्त्वाची आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सर्व ४८ मतदारसंघांचे सर्व्हेक्षण आम्ही करू आणि भाजपा, शिंदेसाहेबांची शिवसेना व आमचा राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमधील निवडून येणे या एकमेव निकषावरच जागा वाटप होईल. त्यात कोणी किती जागा लढवायच्या, असा वाद राहणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. अनेक विद्यमान खासदारांपैकी काहींना तिकिट नाकारले जाऊ शकते, असेही त्यांनी सूचित केले.

तेव्हा नेतृत्व बदल होणार होता
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला. त्या नंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पदावरून बाजूला सारण्याचा निर्णय घेतला होता, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. चव्हाण यांच्या ऐवजी बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील आणि हर्षवर्धन पाटील या तिघांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार होते. काँग्रेसचे तत्कालीन नेते अहमद पटेल यांनी ही माहिती शरद पवार यांना दिली. त्या नंतर पवार यांनी मला आणि आर. आर. पाटील यांना दिल्लीला बोलावून घेतले होते. त्या वेळी मुख्यमंत्री कोणाला करायचे हा त्या पक्षाला निर्णय घेऊ द्या, आपण आपला उपमुख्यमंत्री निवडतो आणि बसवतो, असे मत आपण व्यक्त केले होते. त्या नंतर आमदार आशुतोष काळे यांच्या विवाह प्रसंगी विखे-पाटील आणि आपली भेट झाली होती. या भेटीत मंत्रिमंडळाची रचना आणि सचिवांची नियुक्ती या वरही चर्चा झाली होती. नेतृत्व बदलाची गोष्ट कुणकुण पृथ्वीराज चव्हाण यांना लागल्यानंतर ते आषाढी एकादशीची पूजा करून दिल्लीला गेले. त्या वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी हे परदेशात होते. विमानतळावर चव्हाण यांनी राहुल गांधी यांना गाठले आणि त्या नंतर काँग्रेसचा निर्णय बदलला, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.

साहेबांनी दगदग कमी केली पाहिजे
आपल्या भूमिकेमुळे शरद पवार यांना या वयात होत असलेल्या त्रासाबद्दल थेट प्रश्न विचारला गेला तेव्हा अजित पवार म्हणाले, साहेबांना मी वारंवार सांगत आलोय की, तुम्ही आता फार दगदग करू नका, शांत राहा. मी सर्व सांभाळतो, काम करतो; पण ते ऐकतच नाहीत त्याला मी काय करू ?

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR