पुणे : राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागल्याने थंडीची चाहूल लागली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातही किमान तापमानात घट झाली आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान चंद्रपूर येथे १३ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे.
आग्नेय अरबी समुद्रात मालदीव बेटांजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वा-यांची स्थिती कायम आहे. राज्यात आकाश निरभ्र होत असून, पहाटे गारठा वाढला आहे. दुपारी मात्र ऊन असल्याचे दिसून येत आहे. पहाटे तुरळक धुके आणि दव पडल्याचे चित्र कायम आहे. राज्याच्या किमान तापमानात काहीशी वाढ-घट होण्याची शक्यता आहे.
तर आकाश निरभ्र झाल्याने पुण्यात गारठा वाढला आहे. पुढील पाच ते सहा दिवसांमध्ये हा गारठा वाढणार असून, किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर वेधशाळेत किमान तापमान १५.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
शहर आणि उपनगरांत सूर्यास्तानंतर हवेतील गारठा वाढत आहे. पहाटेपर्यंत हा गारठा सध्या कायम असल्याचे जाणवते. त्यामुळे गेल्या आठवड्यात १७ ते १८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेला किमान तापमानाचा पारा आता १५.७ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला आहे.
मात्र, हे किमान तापमान सरासरीपेक्षा चार अंश सेल्सिअसने जास्त असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये आकाश निरभ्र असल्याने शहरातील गारठा वाढेल. विशेषत: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) लोहगाव, पाषाण आणि शिवाजीनगर या परिसरात किमान तापमानाचा पारा १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले.
मुंबईतही तापमानाचा पारा २४ अंशावरून २० अंशावर घसरला आहे. मुंबईत कडाक्याची थंडी जाणवण्यासाठी डिसेंबर किंवा जानेवारीचा पहिला आठवडा उजाडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात सध्या तापमान हे १५ ते १७ अंश सेल्सिअस इतकं आहे. हे सरासरीपेक्षा २ अंश सेल्सिअसने जास्त आहे. उत्तरेकडे बर्फवृष्टीला सुरुवात झाल्यानंतर या महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्यात मुंबईत थंडी जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोकण, विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या २४ तासांत राज्यातील कोकण आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दक्षिण भारतातील काही राज्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या २४ तासांत केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल या भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये पावसाचा अंदाज आहे.