नागपूर : राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक हे विधिमंडळ आधिवेशनाच्या दुस-या आठवड्याच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. नवाब मलिक यांची प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते अधिवेशनाच्या दुस-या आठवड्याच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याची माहिती आहे. पुढच्या आठवड्यामध्ये नवाब मलिक सहभागी होऊ शकतात, पण या आठवड्यात ते गैरहजर असणार आहेत.
नवाब मलिक शनिवारी मुंबईला रवाना झाले. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते सभागृहाच्या कामकाजासाठी गैरहजर असणार आहेत. डॉक्टरांनी आठवडाभर आराम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. मात्र, पुढील आठवड्यात ते सहभागी असतील अशी शक्यता त्यांच्या कार्यालयाकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना जे पत्र लिहिलं होतं, त्यानंतर ज्या सर्व घडामोडी घडल्या त्यानंतर नवाब मलिक अचानक सोमवारी अधिवेशनाला गैरहजर राहिले. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रामुळे मलिक अधिवेशनासाठी गैरहजर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्याला कारण ठरली माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांची सत्ताधारी बाकावरील उपस्थिती. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करताना तुम्ही देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाहीत, असा घणाघात केला. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाहीत, असे सांगितले.
दुसरीकडे मलिकांच्या एन्ट्रीमुळे महायुतीतच वाद सुरू झाले आहेत, फडणवीस यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले, मलिकांवर आरोप असताना त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. फडणवीस यांच्या या भूमिकेचे शिंदे गटानेही समर्थन केले.