नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. नेहमीप्रमाणे लोकसभेचे कामकाज सुरु होते. प्रेक्षक गॅलरीतून काही लोक कामकाज पाहात होते. अधिवेशन काळात संसदेला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे नेहमीप्रमाणे गॅलरीत प्रेक्षकांची गर्दी होती. दरम्यान, लोकसभेत सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. प्रेक्षत गॅलरीत बसलेल्या दोघांनी सभागृहात खाली उडी मारली. भर लोकसभेत हा प्रकार घडल्याने काहीसा गोंधळ उडाला. याप्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यांचा उद्देश काय होता हे अजून समोर आलेले नाही.
तीन जण प्रेक्षक गॅलरीत बसले होते. त्यांच्याकडे कलर स्प्रे असल्याची माहिती मिळत आहे. स्प्रे आणि काही धूरसदृश्य वस्तूही आढळली. लोकसभेतील या प्रकारामुळे पुन्हा एकदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोघांनी सभागृहात अचानक उडी घेतल्याने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या आहेत. संसदेतून समोर आलेल्या व्हीडीओमध्ये एक व्यक्ती टेबलवर उडी मारताना दिसत आहे आणि सुरक्षा कर्मचार्यांव्यतिरिक्त काही खासदारही त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सभागृहात अचानक धूर सुरु झाला. या प्रकारानंतर लोकसभेचे कामकाज थांबवण्यात आले आहे, अशी माहिती एका खासदाराने दिली.
संसदेबाहेर दोघांचे आंदोलन
संसदेबाहेरही दोन व्यक्तींनी गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी एक तरुण आणि एक महिला असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी तात्काळ दोघांनाही ताब्यात घेतले आहे. रंगीत धुराच्या नळकांड्या या दोघांनी संसदेबाहेर जाळल्या. तसेच, दोघांनीही घोषणाबाजीही केली.
एक जण लातूर मधील
लोकसभेबाहेरील नियमबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेतले आहे. यामध्ये नीलम कौर सिंह ही ४२ वर्षीय महिला हिस्सार हरियाणातील आहे. तर २५ वर्षीय अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. हे दोन्हीही आरोपी दिल्लीतील संसदेबाहेर ट्रान्सपोर्ट भवन येथे आंदोलन करत होते.
धुराचे यंत्र सभागृहात कसे आले?
तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंदोपाध्याय म्हटले आहे की, हा एक भयंकर अनुभव होता. त्यांचे ध्येय काय होते आणि ते असे का करत होते, याचा कोणीही अंदाज लावू शकले नाही. आम्ही सर्वजण लगेचच सभागृहातून बाहेर पडलो, पण ही सुरक्षेत मोठी चूक होती. धुराचे यंत्र सभागृहात कसे आले? असा सवाल त्यांनी केला आहे.