पुणे : लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभागासाठी, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना संसद महारत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी सोळाव्या लोकसभेतील कामगिरीसाठीसुद्धा त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणा-या खासदारांना प्राईम पॉईंट फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे, असे फाऊंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळविले आहे. चालू सतराव्या लोकसभेत सुळे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम असून त्यांनी ९४ टक्के उपस्थिती लावत २३२ चर्चासत्रात भाग घेतला आहे. सभागृहात त्यांनी आतापर्यंत ५८७ प्रश्न विचारले असून १६ खासगी विधेयके मांडली आहेत. या कामगिरीसाठी त्यांना पुन्हा एकदा संसद महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर याच संस्थेचा संसदरत्न पुरस्कार त्यांना सात वेळा प्रदान करण्यात आला आहे. यापूर्वीही त्यांना सर्वोत्तम कामगिरीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार म्हणजे कामाला मिळालेली पावती : सुप्रिया सुळे
प्राईम पॉईंट फाऊंडेशन, चेन्नई यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी दर पाच वर्षांनी देण्यात येणा-या विशेष संसद महारत्न पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला लोकसभेत निवडून पाठविले तो सार्थ ठरविण्यासाठी आपण सदैव कार्यरत आहोत, अशा शब्दांत खासदार सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा पुरस्कार आपल्या कामाला मिळालेली पावती आहे. यापूर्वीही १६ व्या लोकसभेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी देखील हाच पुरस्कार मिळाला होता, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.