वॉशिंग्टन : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही सुरूच आहे. या संघर्षाची व्याप्तीही वाढताना दिसत आहे. तसेच हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका इस्रायलला उघडपणे पाठिंबा देत आहे. अमेरिका नेहमीच इस्रायलच्या पाठीशी उभा आहे. याचा पुनरुच्चारही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केला आहे. दरम्यान, निधी उभारणीच्या कार्यक्रमात बायडेन यांनी केलेल्या टिप्पण्यांकडे अमेरिकेने इस्रायलवर केलेली आतापर्यंतची सर्वात कठोर टीका म्हणून पाहिले जात आहे. गाझामध्ये अंदाधुंद बॉम्बफेक करून इस्रायल जगभरातील पाठिंबा गमावत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हटले आहे.
बायडेन म्हणाले की, अमेरिका इस्रायलच्या पाठीशी उभा आहे, सध्या इस्रायलसोबत अमेरिकेशिवाय इतर लोकही आहेत. युरोपियन युनियन सोबत आहे, पण अंदाधुंद बॉम्बहल्ल्यांमुळे इस्रायलचा पाठिंबा कमी होत आहे. हमासवर इस्रायलला कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण बेंजामिन नेतन्याहू यांना आता बदलले पाहिजेत. नेतान्याहू हे प्रकरण खूप कठीण करत आहेत. आमच्याकडे प्रदेश एकत्र करण्याची संधी आहे. पॅलेस्टाईन हे राज्य नाही असे कोणीही म्हणू शकत नाही.
अलीकडेच अमेरिकेने इस्रायलला ‘मानवी जीवनाला प्राधान्य द्या’ आणि गाझामधील लोकांना संघर्ष टाळण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही इस्रायलच्या वृत्तीवर नाराजी व्यक्त केली होती. जगभरातील अनेक देश, युनायटेड नेशन्स आणि मानवाधिकार संघटना गाझामध्ये इस्रायलच्या बॉम्बफेकीवर टीका करत आहेत आणि तात्काळ युद्धबंदीची मागणी करत आहेत.
तसेच गाझामधील युद्धविराम संदर्भात मंगळवारी (१२ डिसेंबर) संयुक्त राष्ट्र महासभेत मतदान झाले.
इस्रायल आणि हमास यांच्यातील हिंसक संघर्ष संपुष्टात आणण्याच्या प्रस्तावाला भारताने पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या (युएनजीए) व्यासपीठावर, पश्चिम आशिया (मध्य पूर्व) मध्ये दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध थांबवण्याचा सल्ला देणाऱ्या १५३ देशांपैकी भारताचा समावेश होता. इस्रायल आणि अमेरिकेसारख्या देशांचा जोरदार विरोध असूनही भारताने युद्धबंदी प्रस्तावाला पाठिंबा दिला.
भारतासह १५३ देशांचा युद्धबंदीच्या बाजूने मतदान
इस्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या (युएनजीए) तातडीच्या बैठकीत गाझामध्ये तात्काळ युद्धविरामाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. भारतासह १५३ देशांनी गाझामध्ये युद्धबंदीच्या बाजूने मतदान केले. त्याला १० सदस्यांनी विरोध केला, तर २३ सदस्य गैरहजर राहिले.
बॉम्बफेकीत १८,४०० हून अधिक जणांचा मृत्यू
गाझामधील हमासच्या आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, ७ ऑक्टोबरपासून इस्रायली बॉम्बफेकीत १८,४०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हमासच्या हल्ल्यात १२०० इस्रायली मारले गेले. नुकत्याच झालेल्या युद्धबंदीमुळे काही दिवसात परिस्थिती सुरळीत होईल असे वाटत होते, पण तसे काही झाले नाही.