बोरी : ओबीसी समाजाचे नेते आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार, दि.१३ रोजी बोरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापा-यांनी सकाळ पासून आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. तसेच बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
आ. पडळकर यांच्यावरील हल्लयाच्या निषेधार्थ बुधवारी बोरी बंद व रास्ता रोको आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभुमीवर शहरासह तालुक्यातून समाज बांधव सकाळी एकत्र जमण्यास सुरूवात झाली. यावेळी बोरी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. त्यानंतर येथूनच निषेध रॅली काढण्यात आली. कौसडी फाटा चौकमार्गे ही रॅली बस स्टॅण्ड येथे आली. बस स्टँड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
संबंधितांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी बहुसंख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. बंदला व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला.