मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात केली आहे. मुंबई आणि उपनगरांत आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेला उकाडा आणि दमट वातावरणाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
सध्या मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या काही तासांपासून अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूझ आणि वांद्रे यांसारख्या पश्चिम उपनगरांत ढगाळ वातावरणासह जोरदार सरी कोसळत आहेत. या पावसामुळे मुंबईतील जनजीवनावर काहीसा परिणाम झाला आहे. रेल्वे वाहतूक थोडी विस्कळीत झाली असून, मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे १५ मिनिटे उशिराने धावत आहे. तर हार्बर रेल्वेची वाहतूक १० मिनिटे उशिराने सुरू आहे. सुदैवाने, पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या तरी सुरळीत सुरू आहे.
मुंबई आणि उपनगरांतील हवामानाचा अंदाज
मुंबईतील विविध भागांत, विशेषत: दक्षिण मुंबईतील कुलाबा, मरिन ड्राईव्ह तसेच मध्य मुंबईतील दादर, सायन आणि पश्चिम उपनगरांमधील अंधेरी, विलेपार्ले या ठिकाणी आज पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यासोबतच नवी मुंबई आणि ठाण्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज दिवसभर आकाश अंशत: ढगाळ राहील. मात्र दमट वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवावे, अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे.
कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता
गेल्या आठवडाभरापासून कोकणातून गायब झालेल्या पावसाने आता पुन्हा जोर धरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्थानिकांनी सतर्क राहावे. तसेच समुद्रकिनारी भागात वा-याचा वेग जास्त असल्याने समुद्रही खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी पुढील काही दिवस खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.