जळगाव : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. प्रफुल लोढाकडे मंत्री गिरीश महाजन यांच्या अनेक सीडी असल्याचा दावा खडसेंनी केला आहे. विषारी पिल्लांना मीच मोठे केले याचे दु:ख वाटत आहे असेही यावेळी त्यांनी म्हटले आहे. यावेळी खडसेंनी पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण आणि जावई प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भातदेखील प्रतिक्रिया दिली. जावई दोषी असल्यास समर्थन करणार नाही हे आधीच सांगितले असे खडसे म्हणाले.
दरम्यान खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गंभीर आरोप केल्याने खडसेंचा संताप अधिक वाढला आहे. खडसेंनी चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली. या दरम्यान जळगावच्या जामनेर येथे भाजपने एकनाथ खडसे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आंदोलन केले. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.
गिरीश महाजन यांच्या अनेक सिड्या प्रफुल्ल लोढा यांच्याकडे आहेत, असा दावा खडसेंनी केला आहे. ते पुढे म्हणाले, माझ्या विरोधात आंदोलन करून जोडे मारण्याऐवजी गिरीश महाजन आणि प्रफुल लोढा यांना जोडे मारा. खडसे म्हणाले, मी एका पदाधिका-याला विचारले की आंदोलन का करत आहात? त्यावर तो म्हणाला की, वरिष्ठांचा आदेश आहे, म्हणून तुमच्या विरोधात आंदोलन करत आहोत. अशा प्रकारे त्यांनी अशा प्रकारे त्यांनी भाजपवर खोचक टीका केली.
पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, विषारी पिल्लांना मी मोठे केले याचे मला दु:ख वाटते. मी कधीही माझ्या जावयाचे समर्थन केले नाही. कुणाची एक तरी तक्रार आहे का? मग तरीदेखील रुपाली चाकणकर या कोणत्या आधारावर बोलत आहेत? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला. ते म्हणाले या प्रकरणात माझे नाव सतत का घेता, माझा जावई आहे तो. तुमचा मुलगा घराबाहेर गेल्यावर तुम्हाला कळते का? तो दारू पितो का ते? फक्त राजकारणात नाथाभाऊंना बदनाम करून हनी ट्रॅपवरून लक्ष विचलित करणे हा उद्योग सध्या सुरू आहे. मात्र काहीही झाले तरी मी प्रफुल लोढाचा विषय सोडणार नाही, तो लावून धरणार असा इशारा खडसेंनी दिला.
सुरुवातीची रेव्ह पार्टी हाऊस पार्टीत बदलली
सुरुवातीला पोलिस म्हणाले ही रेव्ह पार्टी आहे. मग मी प्रश्न उपस्थित केला की रेव्ह पार्टीची व्याख्या काय? मग पोलिस म्हणाले ही रेव्ह पार्टी नाही हाऊस पार्टी आहे. घरात सात जणांची पार्टी होती. मग प्रांजल खेवलकरांनी ड्रग्ज सेवन केले का तर नाही. ड्रग्ज बाळगले का तर नाही. मग त्या एका मुली व्यतिरिक्त ड्रग्न कुणाकडे होते का तर नाही. खेवलकर प्रकरणात पुण्यातील पोलिस तोंडघशी पडले आहेत. लोढाकडे कोणत्या व्हीडीओ क्लिप आहेत त्या तपासा. कोणत्या मंत्र्यांच्या सीडी आहेत ते तपासा असं खडसे म्हणाले. नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणात ७२ अधिकारी व चार मंत्री आहेत, त्या प्रकरणाची देखील सखोल चौकशी करावी अशी मागणी खडसेंनी केली.