लातूर : प्रतिनिधी
भारत हा कृषी प्रधान देश म्हणुन ओळखला जातो. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असले तरी बैल पोळयाचे महत्व अजूनही कायम आहे. शेतक-यांसोबत वर्षभर शेतात राबणा-या बैलांचा आज साजरा होणार आहे. त्यामुळे विविध साहित्यांनी बाजारपेठ फुलली आहे. मात्र गतवर्षाच्या तूलनेत यंदा बैल पोळ्याच्या साहित्यात वाढ झाली आहे.
बैलपोळा हा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्याच्या दिवशी मोठया उत्साहात साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो. जगाचा पोशिंदा असलेला शेतक-यांच्या सर्जा-राजाचा सण पोळा हा शुक्रवारी २२ ऑगस्टला मोठया उत्सवात साजरा होणार आहे. या बैलपोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या सजावटीच्या साहित्यांनी शहरातील बाजारपेठ फुलली आहे. बाजारपेठेत विविध प्रकारचे रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. वर्षभर आपल्याला साथ देणा-या बैलांच्या सजावटीसाठी शेतकरीसुद्धा दरवर्षी मोठया प्रमाणात साज शृंगाराच्या साहित्याची खरेदी करतो. या सणाच्या पार्शवभूमीवर बैलांच्या सजावटीसाठी लागणारे दोर, झुली, बाशींग, मोरखी, गोंडा, भोरकडी, पायातले घुंगरु, कंडे, फुलांच्या माळा, कंडी, रंग, यासारखे १५० ते २०० विविध प्रकाराचे साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे. शहरातील बाजारात साहित्य ५० ते २००० रुपये दराने विक्रीसाठी दाखल झाले आहे.
लातूरच्या बाजार पेठेत बैलांच्या साहित्य खरेदीसाठी अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला दुकाने थाटली आहेत. यात घुंगरू २०० ते २००० रूपये किलो, पैंजन ५० ते ४०० रूपये, कासरा ३५० रूपये, म्होरकी ५० ते ४०० रूपये, कंठे ६० ते १०० रूपये, मटाटी १०० ते १००० रूपये, वार्णीस ४० ते ६० रूपये, कमरी १०० ते १००० रूपये दराने विक्री केली जात आहे. तसेच बैलांच्या शिंगना लागणारे विविध कलरचे वारणीसही बाजारात विक्रीसाठी आले आहे.