बारामती : पवार घराण्यात आजवर प्रत्येक काकाने पुतण्याला मदत केली आहे. किंबहुना ती पवार घराण्याची परंपराच आहे असे वक्तव्य रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी केले. काही दिवसांपूर्वी सांगलीतील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी रोहित पवार यांना शाब्दिक चिमटा काढला होता.
आपण पोस्टल मतांवर निवडून आलोय, हे लक्षात ठेवावे. भावकीने लक्ष घातले नसते तर तू निवडून आला नसता, असा टोला अजित पवार यांनी रोहित पवारांना लगावला होता. या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार यांनी बुधवारी बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.
सुरुवातीच्या काळात अजित पवार ज्यावेळी निवडणूक लढले होते तेव्हा माझ्या वडिलांनी म्हणजे आप्पासाहेबांनी त्यांना मदत केली होती. नवख्या माणसाला किती मतदान पडते आपल्याला माहिती आहे. परंतु, त्यानंतर अजित पवार यांनी ३५ वर्षे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्त्व केले. काहीजण पोस्टल मतावरती निवडून आले असले तरी काळ आणि वेळ बदलते असे राजेंद्र पवार यांनी म्हटले. छत्रपती सहकारी साखर कारखान्याला निवडणुकीत वडील माझा विचार करतील असे मला वाटले होते. परंतु आमच्या सगळ्या काकांना पुतण्याच दिसतो.
तिथेदेखील मला बघितले नाही त्यावेळी माझ्या वडिलांनी अजितदादांना संधी दिली. मला तिस-यांदा संधी मिळाली पण त्यावेळेस देखील मला सांगितले गेले की, सगळ्यांनीच राजकारणात यायचे नसते. तेव्हा मला त्यांचे बोलणे पटले, मग मी शांत बसलो. त्यावेळेस मला माहित नव्हते की, संधी असते त्यावेळेस खेचून घ्यायची असते. मला कारखान्याला संधी दिली नाही. त्यानंतर वाटले असेल की हा कारखाने काढेल. जळगावला काढेल, नगरला काढेल, मराठवाड्यात काढेल, बारामतीच्या आसपास काढेल आणि त्यामुळे माझ्या काकांनी मला संधी दिली नाही आणि मी आता इथे तुम्हाला एआय तंत्रज्ञान काय आहे सांगायला उभा राहिलो आहे. भविष्यात एआय तंत्रज्ञानाशिवाय गत्यंतर नाही.
अख्ख्या राज्याला किस्सा माहिती आहे आम्ही गाई आणायला गेलो, त्यावेळी अजितदादा केबिनमध्ये बसले आणि मी पाठीमागे गाईच्या शेपटाजवळ बसलो. दादा पुढच्या केबिनमधून पुढच्या केबिनमध्ये, पुढच्या केबिनमध्ये, पुढच्या केबिनमध्ये गेले, मात्र आम्ही तिथेच मागे राहिलो. दादांना गायींचा व्यवसाय चांगला जमायचा. माझी गाय तीन हजाराला गेली की दादांची गाय नऊ हजाराला जायची, असे राजेंद्र पवार यांनी म्हटले. संघटनावाल्यांना मला काय म्हणायचं नाही. त्यांचे ते काम करतात. पण मला तरी वाटत नाही की, शेतमालाचा भाव वाढेल.
स्वस्तवाल्यांना जास्त लोक मतदान करतात, सरकार आयुष्यात ठोस निर्णय घेऊ शकत नाही. पाणी जर जास्त दिले तर पुढच्या पिढीला जमिनी राहणार नाहीत. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव एवढा असेल की, पुढच्या आठ दहा वर्षात शाळेत शिकवायला शिक्षक नसतील, गाडी चालवायला ड्रायव्हर नसतील. २०४० मध्ये मेंदूदेखील बदलला जाणार आहे. त्यामुळे राजकारण देखील तसेच असणार आहे. भरणे मामा त्या काळात आम्ही नसतो, तुम्हाला संधी आहे अशी टिप्पणी राजेंद्र पवार यांनी केली.
इथे राज्यकर्ते स्टेजवर आहेत मला कोणाला नावे ठेवायची नाहीत. माळेगाव मध्यवर्ती संशोधन केंद्राने २६५ सारखी उसाची जात काढून टनाटनाने महाराष्ट्राचे साखर वाढवली. पण त्या पाडेगाव संशोधन केंद्राकडे बघायला कोण तयार नाही. विद्यापीठाला नावे ठेवू नका. त्यांना आपल्याला मदत करणे गरजेचे आहे. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते का नाही, हा तुमचा विषय आहे.
कृषीमंत्र्यांना मला सांगायचे आहे महाराष्ट्रात एका एका स्क्वेअर फुटाचे देखील मापन झाले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी, नागपूर भागात त्याला तुम्ही सपोर्ट करणे गरजेचे आहे. सबसिडीसाठी जो थांबतो कधी यशस्वी होत नाही. त्यामुळे शेतक-यांनी सबसिडीसाठी थांबू नका असे राजेंद्र पवार यांनी सांगितले.