नवी दिल्ली : सुरक्षेतील त्रुटींवर चर्चा करण्याच्या विरोधकांच्या मागणीवरून झालेल्या गदारोळात ‘अशोभनीय वर्तन’ केल्याबद्दल ओब्रायन यांना गुरुवारी संसदेच्या उर्वरित अधिवेशनासाठी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. वरिष्ठ सभागृहातून निलंबित करण्यात आल्यानंतर गुरुवारी संसदेच्या संकुलात मूक आंदोलन करण्यात आले. ओब्रायन गळ्यात फलक घेऊन संसद भवनातून बाहेर पडले. या फलकावर ‘मूक निषेध’ असे लिहिले होते. निलंबनाच्या मुद्द्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. डेरेक ओब्रायन यांच्या समर्थनार्थ टीएमसी मैदानात उतरली असून गृहमंत्री शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
टीएमसीने सरकारवर संसदेची सुरक्षा सुनिश्चित करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. डेरेक ओब्रायन यांना निलंबित केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी टीएमसीने केली. ओब्रायन यांच्या निलंबनावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी नापसंती व्यक्त केली आणि बुधवारी संसदेत सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या दोन व्यक्तींच्या प्रवेशाची सोय करणाऱ्या भाजप खासदारावर कारवाई न झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले की, घुसखोरांना पास जारी करणाऱ्या भाजप खासदारावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसताना १५ खासदारांना निलंबित करण्यात आले. हा न्याय आहे का? गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत येऊन सभागृहात निवेदन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.