गडचिरोली : गडचिरोली येथे कमांडोसोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. छत्तीसगडच्या सीमेजवळ गुरुवारी दुपारी नक्षलवादी आणि सी-६० कमांडोमध्ये चकमक झाली. जिल्ह्याचे एसपी नीलोत्पल यांनी माध्यमांना सांगितले की, आतापर्यंत दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. परिसरात अजूनही शोधमोहीम राबविण्यात येत आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर कारवाई करण्यात आली. छत्तीसगडमधील मानपूर जिल्ह्यातील बोधीटोलाजवळ नक्षलवाद्यांचा एक मोठा गट पोलीस दलावर हल्ला करून निष्पाप आदिवासींना मारण्याच्या उद्देशाने तळ ठोकून होता. हि माहिती मिळाल्यानंतर तातडीने सी-६० कमांडोद्वारे शोध मोहीम हाती घेण्यात आली. पोलीस दल परिसरात शोध घेत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यावर पोलीस दलाने प्रत्युत्तर दिले. सुमारे तासभर गोळीबार सुरू होता. यानंतर परिसरात शोध घेत असताना, एके-४७ आणि एसएलआरसह दोन पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले.
जांभूळखेडा बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड ठार
सापडलेल्या मृतदेहांपैकी एकाची ओळख कसनसूर दलमचा डेप्युटी कमांडर दुर्गेश वट्टी अशी झाली आहे. तो २०१९ च्या जांभूळखेडा बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड होता. या स्फोटात गडचिरोली पोलिसांचे १५ पोलीस शहीद झाले होते.