नागपूर (प्रतिनिधी) : रोहित्र (ट्रान्सफार्मर) नादुरुस्त होणे, विजेचा दाब वाढल्यामुळे रोहित्र जळणे असे प्रकार वारंवार घडतात व त्यामुळे शेतकरी, नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. नादुरुस्त रोहित्र ३ दिवसांत दुरुस्त करून देण्यासाठी नवीन जलद प्रतिसाद मिळण्यासाठी ऑनलाईन रिपोर्टिंग व्यवस्था उभारली जात आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या वेळी दिली.
भाजपाच्या अभिमन्यू पवार यांनी या बाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रोहित्र नादुरुस्तेची सूचना किंवा तक्रार ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी एका अॅपची निर्मिती करण्यात येत आहे. या अॅपच्या माध्यमातून कुठलाही नागरिक रोहित्राबाबत ऑनलाईन तक्रार करू शकतो. तक्रार केल्यानंतर ३ दिवसांत नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्यात येईल. दुरुस्ती न झाल्यास संबंधित अधिका-यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. हे अॅप सर्वसामान्य लोकांना वापरण्यास सुलभ असेल, असेही त्यांनी सांगितले.
यंदा प्रथमच अर्थसंकल्पात नादुरुस्त रोहित्र बदलणे, रोहित्रांची क्षमता वाढवण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. आर. डी. एस. एस. (रेव्हॅम्पड डिस्ट्रिब्यूशन सेक्टर स्कीम) या योजनेत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे. या योजनेच्या माध्यमातून वीज वितरण यंत्रणा अद्ययावत व नवीन यंत्रणा उभारण्यात येईल. राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून ३९ हजार कोटी रुपयांची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध कामे निविदा प्रक्रियेत आहेत. येत्या काळात वीज वितरण क्षेत्रात अतिरिक्त पायाभूत सोयीसुविधा उभारण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला या योजनेतून निधी दिला आहे. औसा विधानसभा मतदारसंघात आरडीएसएस योजनेअंतर्गत ३३/११ केव्ही क्षमतेची ७ उपकेंद्र मंजूर करण्यात आली आहे तसेच आर. डी. एस. एस योजनेंतर्गत ११ उपकेंद्रांची क्षमतावृध्दी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.