31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeक्रीडाभारताचा १०५ धावांनी मोठा विजय

भारताचा १०५ धावांनी मोठा विजय

जोहान्सबर्ग : सूर्यकुमार यादवच्या वादळी शतकानंतर कुलदीप यादवच्या भेदक मा-याच्या जोरावर भारताने अखेरच्या टी-२० सामन्यात १०६ धावांनी विजय मिळवला. कुलदीप यादवने आफ्रिकेच्या पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. निर्णायक लढतीत द. आफ्रिकेचा पराभव करत भारताने ३ सामन्याची मालिका १-१ बरोबरीत सोडली. भारताच्या विजयात सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सूर्यकुमार यादवने झटपट शतक झळकावून भारतीय संघाला २०० चा टप्पा ओलांडून दिला आणि नंतर कुलदीप यादवने ५ विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला १०० चा टप्पाही ओलांडू दिला नाही. त्यामुळे भारताचा मोठा विजय झाला.

भारताने दिलेल्या २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. सलामीवीरांपासून दिग्गज फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतल्याने द. आफ्रिकेला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. डेविड मिलरने २५ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. त्याशिवाय कर्णधार एडन माक्ररमने २५ धावांचे योगदान दिले. हेंड्रिक्स याने आठ धावा केल्या. हेनरिक क्लासेन याला फक्त पाच धावा करता आल्या. इतर फलंदाज अपयशी ठरल्याने द. आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला.

कुलदीपचा पंच
भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक भेदक मारा केला. कुलदीप यादवने २.५ षटकात १७ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट घेतल्या. कुलदीप यादवने आफ्रिकेची तळाची फलंदाजी तंबूत धाडली. रविंद्र जडेजा याने दोन विकेट घेतल्या. जडेजाने तीन षटकात २५ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंह यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

सूर्याचे शानदार शतक
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिस-या टी-२० सामन्यात सूर्या चमकला. या सामन्यात सूर्याने दणदणीत फटकेबाजी करत आपले शतक झळकावले. टी-२० क्रिकेटमधील त्याचे हे चौथे शतक ठरले. सूर्याने या सामन्यात ५६ चेंडूंत सात चौकार आणि आठ षटकारांसह १०० धावांची खेळी साकारली. सूर्याला यावेळी यशस्वी जैस्वालने ६० धावांची खेळी साकारत चांगली साथ दिली. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात २०० धावांचा पल्ला ओलांडता आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR