नागपूर : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात शुक्रवारी अनेक मुद्द्यांवरून विधानसभेत जोरदार चर्चा झाली. दरम्यान आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीडमध्ये घडलेल्या घटनेवर त्यांची भूमिका विधानसभेत मांडली. ते म्हणाले की, या जाळपोळीत मराठा संघटनांचा हात नाही. या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि या यामागचा मुख्य आरोपी शोधून काढले पाहिजे. दुकाने, पक्षांची कार्यालय जाळण्यात आली. समाजकंटकांनी नियोजन आखून माझ्या घराची लाईट आणि पाण्याची पाईप तोडली. याचे सीसीटीव्ही व्हीडीओ माझ्याकडे आहेत, असे ते म्हणाले
क्षीरसागर म्हणाले की, हा प्रकार होत असताना पोलिसांची गाडी माझ्या घराबाहेर तैनात होती. पण, समाजकंटक आल्यानंतर पोलिसांची गाडी बाजूला गेली. जाळपोळीच्या घटना घडल्यावर मी बीडमध्ये नव्हतो. कुणाचे दुकाने आणि घर जळाल्याचे मला कार्यकर्त्यांचे फोन येत होते. हे लोन माझ्या घरापर्यंत आले. मी पाच ते दहावेळा पोलिसांशी संपर्क साधला. पण, कुठल्याही प्रकारची कारवाई सात ते आठ तासांच्या कालावधीत झाली नाही, असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.
ते म्हणाले की, हा जमाव सात ते आठ तास शहरात धुमाकूळ घालत होता. पोलीस प्रशासन या जमावाबरोबर फिरत होता. एखादे ऑफिस जाळल्यानंतर जमाव एकमेकांना फोन करून इकडे काम झाल, पुढील क्रमाकांवर चला असे सांगत होता. सर्व घटनांना क्रमांक देण्यात आले होते. जमावातील अनेकांच्या अंगावर बॅगा होता. पेट्रोल आणि फॉस्परस बॉम्बचा वापर करण्यात आला, असे संदीप क्षीरसागरांनी म्हटले.