25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रअदानी समूहाविरोधात ठाकरे गटाचा शनिवारी भव्य मोर्चा

अदानी समूहाविरोधात ठाकरे गटाचा शनिवारी भव्य मोर्चा

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अदानी समूहाविरोधात आक्रमक झाले आहेत. स्वत: उद्धव ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करणार असून त्यासाठी ठाकरे गटाने जय्यत तयारी केली आहे. मोर्च्याचा निमित्ताने धारावी सज्ज झाली आहे. धारावीत ठिकठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. धारावीतील प्रत्येक घरातला व्यक्ती मोर्चाला नेण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असून या मोर्चात दीड लाख लोक सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.

ठाकरे गटाचे माजी आमदार बाबूराव माने यांनी माध्यमांना सांगोतले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. टी जंक्शन ते अदानी समूहाच्या कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा निघेल. या मोर्चात एक ते दीड लाख लोक सहभागी होतील. मुंबईतील अनेक नेते या मोर्च्याच्या शेवटी संबोधित करतील. पोलिसांनी परवानगी दिली नाहीतरी आम्ही या मोर्चावर ठाम आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी आम्ही काळजी घेऊ. धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत लोकांमध्ये संभ्रमाचा वातावरण आहे. झोपडपट्टी पुनर्विकास केला जातो त्याबद्दल स्पष्टता नाही. केवळ अदानींना फायदा देण्यासाठी त्यांच्या माध्यमातून विकास केला जात आहे, असे बाबूराव माने यांनी म्हटले आहे. तसेच धारावीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. गौतम अदानी हे भाजपाचे उद्योगपती जावई आहेत. भाजपाच्या जावयाला मुंबई गिळायची आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही, असे संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

ताबा मिळवण्यासाठी भाजपचा प्रयत्न
खासदार संजय राऊत यांनी हा मोर्चा निघणारच असे म्हटले आहे. मोर्चा फक्त धारावीसाठीच नाही तर मुंबईकरांसाठी आहे. सगळ्यांवर ताबा मिळवण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना मुंबई गिळायची आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. मोर्चा निघणारच. या मोर्चाला मुंबईकर उपस्थित असतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संपूर्ण परिसर भगवामय
मोर्चासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. टी जंक्शन ते अदानी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी या मार्गावर प्रचंड बॅनरबाजी करण्यात आली आहे. होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. झेंडे लावण्यात आले आहेत. त्यामुळे हा संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR