परभणी : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून मोबाईल चो-यांचे प्रमाण वाढले आहे. यावर पोलिस विभागाच्या वतीने १ ते १४ डिसेंबर दरम्यान विशेष मोहीम राबवून ३८ लाखांचे १८७ मोबाईल शोधण्यात यश मिळविले आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, सायबर पोलिस ठाण्याच्या तांत्रीक विश्लेषनाच्या आधारे परभणी पोलिसांची एकूण १४ पथके नियुक्त केली. यात २९ अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली होती.
नागरिकांचे २०२३ या वर्षात गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी नियुक्त पथकातील कर्मचारी तसेच सायबर पथकास पोलिस अधीक्षक रागसुधा यांनी विशेष मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. ३८ लाख ९ हजार २६० रुपये किमतीचे गहाळ झालेले १८७ मोबाईल पोलिसांनी महाराष्ट्र राज्यातील परभणी, नांदेड, लातूर, जालना, छत्रपती संभाजी नगर, सातारा, बीड, हिंगोली, नाशिक, पुणे, अकोला, वाशिम, अहमदनगर, बुलढाणा व धाराशिव जिल्ह्यातून तसेच शेजारील तेलंगना राज्यातून निजामबाद येथून हस्तगत केले आहेत.