सोलापूर : अनावश्यक गोष्टींचा बाऊ न करता योग्य संवाद व विचाराच्या तडजोडीने विवाह जुळावेत, त्यासाठी वधूवर मार्गदर्शन ही काळाची गरज असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. प्रा. श्रुतीश्री वडगबाळकर यांनी व्यक्त केली.
कौस्तुभ ब्राम्हण वधू वर सूचक केंद्र व सहयोग ब्राम्हण सेवा संघ जुळे सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माहिती पुस्तक प्रकाशन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जनता बैंक संचालक आनंदराव कुलकर्णी, रा. स्व. संघाचे माजी कार्यवाह संतोष कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग रजपूत, कौस्तुभ वधू-वर सूचक मंडळाचे संचालक रवींद्र नाशिककर, रश्मी नाशिककर, सहयोग ब्राम्हण सेवा संघाचे अध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
यावेळी त्या म्हणाल्या, पालकांनी संस्कारित, कर्तृत्ववान, कष्टाळू मुलामुलींचा विचार करून
पत्रिका किंवा अन्य दोष जुजबी बघावेत. संवाद व विचारांनी तडजोडीने विवाहास चालना द्यावी. विवाह जुळविण्यात मोह, अपेक्षा, शो टाळावेत. यावेळी उल्लेखनीय कार्याबद्दल प्राचार्या उज्वला साळुंके, अनुजा कुलकर्णी, आनंद क्षीरसागर, विक्रम ढोनसळे, प्रा. पी. पी कुलकर्णी, श्याम पाटील व शुभदा देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला, प्रा. शुभदा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नरेंद्र काटीकर प्रास्ताविक केले. प्रकाश दिवाणजी यांनी आभार मानले.