धाराशिव : प्रतिनिधी
श्रीक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे बनावट अॅप तयार करून भाविकांकडून पैसे घेतले. मंदिर संस्थानची व भाविकांची फसवणूक केल्याप्रकरणी तुळजापूर येथील विजय सुनिल बोदले यांच्या विरोधात तुळजापूर पोलीस ठाणे येथे दि. १४ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीक्षेत्र तुळजापूर येथे तुळजाभवानीचे मंदिर आहे. तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठ येथे राहणा-या आरोपी विजय सुनिल बोदले यांनी दि.१५ जुलै २०२३ रोजी तुळजाभवानी मंदीर प्रशासनाची कसलीही परवानी न घेता तुळजाभवानी देवीचे नावाशी साधर्म्य असणारे ऑनलाईन पूजा या नावाचे अॅप तयार केले. संगणकीय साधनांचा वापर करुन वेबबेस्ड व मोबाईल बेस्ड अॅप्लीकेशन तयार करुन तुळजाभवानी देवीजींचा फोटो व लोगो वापरुन ते श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानाचे अधिकृत अॅप असल्याचे भासविले.
त्यावरती भाविंकामार्फत वेगवेगळ्या पूजा करण्यासाठी भाविकांकडून पैसे घेवून भाविकांची व मंदीर संस्थानची फसवणूक केली. या प्रकरणी तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक अनिल बापूराव चव्हाण यांनी दि.१४ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पोलीस ठाणे येथे कलम ४१७, ४१९, ४२०, भा.दं.वि.सं. सह कलम ६६ (सी), ६६ (डी) आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवला आहे.