लातूर : प्रतिनिधी
औसा तालुक्यातील बुधोडा-वान्ग्जेवाडी येथील माणूस प्रतिष्ठान द्वारा संचलित ‘माझं घर’ मध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत असून शरद झरे व संगीता झरे यासाठी पुढाकार घेत आहेत. विद्यार्थ्यांना प्रकल्पामध्ये गांधीजींच्या नई तालीम संकल्पनेवर आधारित स्वावलंबणाचे धडे दिले जातात. गतवर्षी मुलांनी स्वत: तयार केलेल्या आकाश कंदील, उटणे, पणत्या विक्रीतून मिळालेल्या २ लाख रुपय पैशातून प्रकल्पातील भिंतीवर रंगवलेली चित्रे व रेखाटलेल्या माहितीच्या माध्यमातून भिंती बोलक्या झाल्या आहेत. सर्व भिंतींवर विविध विषयांवर आधारित चित्रे रेखाटली आहेत.
विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपयुक्त असे पाठ भिंतीवर रंगवले आहेत. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी माहिती रेखाटल्याने माझं घरच्या भिंती जणू विद्यार्थ्यांशी बोलू लागल्या आहेत असे चित्र दिसून येते. भिंतीवर तारांगण, चंद्र, सूर्य, आकाशमाला, मराठी बाराखडी, मराठी-इंग्रजी महिने, व्याकरण, दिशाज्ञान, गणितीय पाडे, बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार, इंग्रजी शब्द, कालमापन, शरीराचे अवयव गिरविण्यात आले आहेत. पर्यावरणीय माहिती, भौगोलिक माहिती, महाराष्ट्र व भारताचा नकाशा, विज्ञान, निसर्गविषयक माहिती, प्राणी-पक्ष्यांची चित्रे काढण्यात आली आहेत. याबरोबरच विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व संगीत कलेची माहिती व्हावी या उद्देशाने तबला, पेटी, ढोलकी, वीणा यासारखे संगीतवाद्ये रंगवली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडत शिक्षणात रुची वाढत आहे.