लातूर : एजाज शेख
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयद्वारा आयोजित ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२४ ची प्राथमिक फेरीत लातूर केंद्रावर येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृति सभागृहात दि. १५ डिसेेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सुधाकरराव कुलकर्णी स्मृति प्रतिष्ठान, लातूर निर्मित अमेय दक्षिणदास लिखीत आणि अनिल कांबळे दिग्दर्शित ‘द कॉन्शन्स’ हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आले.
पुरुष प्रधान संस्कृतीमुळे आपल्या अर्धांगिणीला आपल्यापेक्षा कमी बुद्धीची समजण्याची मानसीकता, पती-पत्नीत यामुळे निर्माण होणारा संघर्ष, सदैव सहन करण्याची स्त्रीयांच्या मानसीकतेतून पत्नीनेच नेहमी पडती बाजू घेऊन संसार चालविण्याचा संस्कार आणि खरी नसलेल्या प्रतिष्ठेत गुरफटून आपलीच स्तुती आपण करण्याची प्रवृत्ती, त्यातून निर्माण झालेला मानसिक आजार. परंतू, तो झालाच नाही, अशा बेगडी मुखवट्याची चिरफाड म्हणजे ‘द कॉन्शन्स’ ही अतिश्य उत्कृष्ट कलाकृती होय. लेखक अमेय दक्षिणदास यांनी या नाटकाचे लेखनच मुळात दमदार केलेले आहे.
कथानक उत्तम असल्यामुळे त्याचे सादरीकरणही तितक्याच ताकदीचे झाले. अनिल कांबळे यांनी हे कथानक हताळताना खुप कष्ट घेतल्याचे दिसून आले. त्यांनी संहितेच्या गरजेनूसार घेतलेले बारकावे त्यांच्यातील एक सशक्त्त दिग्दर्शकाचे प्रतिक ठरले.
डॉ. मुकुंद भिसे (शाम), डॉ. अभिजित मुगळीकर (सत्यजित मनस्वी) आणि डॉ. ऋजुता अयाचित (मीरा) या तिघांनी नाटक खुप सक्षमपणाने उभे केले. अचाट बुद्धीमत्तेचा धनी असल्याचा भास असलेला शाम डॉ. मुकूंद भिसे यांनी अगदी सहजतेने आपल्या कसदार अभिनयातून साकारला. डॉ. ऋजुता आयाचित आणि डॉ. अभिजित मुगळीकर यांनीही आपापल्या अभिनयाची छाप सोडली. डॉ. मिलिंद पोतदार, नंदकुमार वाकडे यांचे नेपथ्य उत्कृष्ठ होते. संजय अयाचित व बळवंत देशपांडे यांची प्रकाशयोजना नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेणारी होती. दयानंद सरपाळे यांचे संगीत संयोजन छान होते. वनिता राऊत, भारत थोरात यांची रंगभूषा नाटकाच्या गरजेनूसार होती. ‘ द कॉन्शन्स’ खिळवून ठेवणारा नाट्यप्रयोग ठरला.