31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रशेतक-यांनी हायटेक होत पीक फवारणीसाठी ड्रोन वापरावे

शेतक-यांनी हायटेक होत पीक फवारणीसाठी ड्रोन वापरावे

प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम राबविणार - धनंजय मुंडे

मुंबई : सध्या पारंपरिक शेती करण्यापेक्षा शेतीकडे व्यावसायिकपणे बघण्याची गरज आहे. बदलत्या काळात शेतक-यांनी कमी श्रमात जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत शेतीत अत्याधुनिक यंत्रांच्या वापरावर भर द्यावा. फवारणीसाठी ‘ड्रोन’चा वापर करावा, पर्यायाने शेतकरी ‘हायटेक’ झाल्यास उत्पादन खर्च २५ टक्क्यांनी कमी होईल, असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत व्यक्त केला.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेसंदर्भातील लक्षवेधीची सूचना अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत मांडली होती. यानंतर चर्चेतून अनेक उपप्रश्न पुढे आल्यानंतर मुंडे यांनी फवारणीसाठी ‘ड्रोन’चा पर्याय पुढे आणला. अलीकडे शेती व्यवसायात मनुष्यबळाचा अभाव आहे. तर यंत्र युगात अत्याधुनिक पद्धतीने शेतक-यांचे कष्ट कमी होऊन कमी कालावधीत अधिकचे उत्पन्न शक्य आहे. यासाठी केंद्र शासनाकडून ‘एसओपी’ अर्थात स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (प्रमाणित कार्यपद्धती) तयार करण्यासाठी मार्गदर्शन घेण्यात येईल.

त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ड्रोन पायलट अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण वर्ग चालविता येतील. जेणेकरून शेतक-यांना याचा लाभ घेता येईल. शेतक-यांच्या मुलांनाही या ड्रोन पायलट, तसेच मेकॅनिकल अभ्यासक्रमाचा फायदा होईल. सोबतच शेतमालासाठी मार्केट लिंक तयार मिळाल्यास कृषि क्रांती शक्य आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेअंतर्गत ३६२ शेतक-यांनी मधुमक्षिकापालन व्यवसाय केला. ५ कोटी २३ लाखांचे अनुदान त्यांना मिळाले, असे मुंडे म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दरमहा लोकशाही दिन पाळला जातो. त्या ठिकाणी विविध विभागांचे अधिकारी असतात. त्या दिवशी कृषि अधिकारी उपस्थित राहिल्यास अनेक शेतक-यांच्या तक्रारी दूर करता येणे शक्य आहे, अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी केली. यावर जिल्ह्यातील शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी याचा विचार करता येईल, असेही मुंडे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR