नागपूर : आज वर्ध्यात ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात छगन भुजबळ, गोपिचंद पडळकर आणि विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत. वर्ध्याच्या लोकमहाविद्यालय मैदानावर हा मेळावा घेण्यात येत आहे.
आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ही भावना निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रभर ओबीसी एल्गार मेळावे घेत आहोत. त्यात विदर्भातील पहिला मेळावा आज वर्ध्याला होत असल्याची माहिती प्रकाश शेंडगे यांनी दिली. आजचा मेळावा ऐतिहासिक होणार आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी हा एल्गार असल्याचे शेंडगे म्हणाले.
मागासवर्गीय आयोग हा मागास न राहता मराठा आयोग झाला आहे असा घणाघात प्रकाश शेंडगे यांनी केला. मराठा समाजाला इडब्ल्यूएसमध्ये १० टक्के आरक्षण आहे. ते वाढवून घेण्यासाठी वेगळा प्रयोग करायचा असेल, टक्केवारी वाढवून घ्यायची असेल तर तुमच्यासोबत कुठेही यायला तयार आहोत, अगदी दिल्लीतही यायला तयार आहोत, असे शेंडगे म्हणाले.
आयोगाच्या सदस्यांना अक्षरश: हाकलून दिले आहे, राजीनामे घेतले गेले आहेत. आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे तर जरांगे यांच्या पायाजवळ बसले होते, त्यांना सर सर म्हणत होते. मागासवर्गीय आयोग हा मागास न राहता मराठा आयोग झाला आहे, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.