पुणे : सिंचन व्यवस्थेमुळे जिराईत क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले. त्याचा परिणाम खरीप हंगामात घेतल्या जाणा-या कडधान्यांच्या उत्पन्नावर झाला. तसा खाद्य तेलाच्या उपन्नासाठी घेतल्या जाणा-या सूर्यफुलाच्या पिकावरही झाला आहे. सिंचन क्षेत्र वाढण्यापूर्वी सूर्यफुलाचे उत्पन्न मोठ्या पद्धतीने अगर भुईमूग, ज्वारी, बाजरी, तंबाखू पिकात घेतले जायचे. शेती कमी असणा-या शेतक-याच्या शेतात हमखास सूर्यफुलाचे ताटवे उठून दिसायचे. हल्ली मात्र हे चित्र पुसटसे झाले असून सद्यस्थितीत सूर्यफुलाचे होणे दुर्मिळ झाले आहे.
हलक्या, मध्यम प्रतीच्या जमिनीत मोठ्या पद्धतीने कमी पाणी, कमी खर्च, कमी कालावधीत एकरी सात ते आठ क्विंटलचा उतारा देणारे हे पीक आहे. अतिवृष्टीने सोयाबीनसारखे पीक हातचे जात नाही. पाणी कमी लागत असल्याने अत्यल्प पर्जन्यमानातही पीक तग धरून उत्पन्न घटत नाही. पेरणीनंतर एक-दोन कोळपणीवर पीक जोमात येते. सुपाच्या आकाराएवढी येणारी सूर्यफुले शेतक-यास आर्थिक समृध्दी देणारी आहेत. ज्वारी, बाजरीच्या पिकातील सूर्यफुलाचे मोगणे वर्षाकाठी लागणा-या खाद्यतेलाची सोय करणारे असले तरी काळाच्या ओघात सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याने हे पीक दुर्लक्षिले जाऊ लागले आहे. पीक आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असले तरी सोयाबीनचे अवास्तव वाढलेले प्रस्थच सूर्यफुलाच्या पिछाडीस कारणीभूत असल्याचे दिसून येते.
सूर्यफुलाचे तेल आरोग्यासाठी लाभदायक
सूर्यफुलाचे दाणे सेवन केल्याने हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत होते. कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबावर नियंत्रण मिळविता येते. तेलाचे आहारातून नियमित सेवन झाल्यास शुक्राणू बळकट होण्यास मदत होते. प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो असे शास्त्रीय निष्कर्ष आहेत.
मधमाशांचे दर्शन दुर्मिळ झाले!
सेंद्रीय शेणखताच्या जोरावर पिके घेतली जायची तेव्हा सूर्यफुलाच्या ताटव्यावर परागकण वेचण्यासाठी मधमाशांचा गोंगाट असायचा. बांधावरील झाडाझुडपांवर मधमाशांची पोळी आढळून यायची. काळ बदलत गेला. सूर्यफुलाचे ताटवे दिसेनासे झाले आहेत. रासायनिक विषारी औषधांमुळे मधमाशा नाहीशा होत गेल्याने बांधावरील, डोंगर कपारीतील झाडाझुडपांवरही मधमाशांचे पोळे आढळून येणे दुर्मिळ झाले आहे.