नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडी पहिल्यांदाच चौकशी करणार आहे. ही चौकशी अरविंद केजरीवाल यांच्या मद्य धोरण प्रकरणातील भूमिकेबाबत असणार आहे. यापूर्वी सीबीआयने या वर्षी १६ एप्रिल रोजी केजरीवाल यांची चौकशी केली होती आणि त्यांना ५६ प्रश्न विचारण्यात आले होते. काही आरोपी आणि साक्षीदारांच्या जबाबात केजरीवाल यांचे नाव समोर आले आहे. ज्याचा उल्लेख एजन्सींनी त्यांच्या रिमांड नोट आणि चार्जशीटमध्ये केला आहे. चार्जशीटनुसार, मद्यविक्री धोरणातील आरोपी विजय नायर याची मुख्यमंत्री कार्यालयात वारंवार ये-जा असायची आणि तो आपला जास्तीत जास्त वेळ येथे घालवत असे.
चार्जशीटनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी मद्य धोरणाबाबत चर्चा करतो, असे विजय नायर याने अनेक दारू व्यापाऱ्यांना सांगितले होते. विजय नायर यानेच इंडोस्पिरिटचे मालक समीर महेंद्रू यांची अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी ओळख करून दिली. जेव्हा मीटिंग यशस्वी झाली नाही, तेव्हा त्याने समीर महेंद्रू आणि अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या फोनवरून फेस टाईम अॅपवर व्हिडिओ कॉलद्वारे बोलले. संभाषणात अरविंद केजरीवाल म्हणाले की, विजय नायर हे त्यांचे अपत्य आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि सहकार्य करा, असा दावा चार्जशीटमध्ये करण्यात आलेला आहे.
तसेच पहिला आरोपी आणि आता साऊथ लिकर लॉबीचा साक्षीदार राघव मागुंटा याने सांगितले की, त्याचे वडील वायएसआर खासदार एमएसआर यांनी दिल्ली मद्य धोरणाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती.