26.1 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeराष्ट्रीयभारतातील १४ राज्यांत बालविवाहात वाढ?

भारतातील १४ राज्यांत बालविवाहात वाढ?

नवी दिल्ली : अलीकडच्या काळात बालविवाह रोखण्यासाठी किंवा निर्मूलनासाठी अनेक महत्त्वाचे प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र, एका अभ्यासात हे प्रयत्न अपुरे असल्याचे आढळून आले आहे. अहवालानुसार, देशात आजही दर पाच मुलींमागे एक आणि प्रत्येक सहा मुलांपैकी एक मुलगा अल्पवयीन असतानाच विवाहबद्ध होत आहेत. बालविवाहासंदर्भात जागतिक आरोग्य जर्नल ‘लॅन्सेट’चा अभ्यास समोर आला आहे. त्यानुसार गेल्या काही वर्षांत बालविवाह रोखण्याचे प्रयत्न थांबले आहेत. भारतातील १४ राज्यांत बालविवाहात वाढ झाल्याची माहितीही समोर आली आहे.

गेल्या पाच वर्षांत (२०१६ ते २०२१) बालविवाहावर केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बालविवाह खूप सामान्य झाले आहेत. सहा राज्यांमध्ये मुलींचे बालविवाह वाढले आहेत. या राज्यांमध्ये मणिपूर, पंजाब, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. आठ राज्यांमध्ये अल्पवयीन असतानाच मुलांची लग्ने होत आहेत. यामध्ये छत्तीसगड, गोवा, मणिपूर आणि पंजाबचा समावेश आहे.

भारताचे राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण १९९३ ते २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आले होते. बालविवाहावरील या लॅन्सेट अभ्यासासाठी संशोधकांनी या सर्वेक्षणातील डेटा वापरला. विशेष म्हणजे काही राज्यांमध्ये बालविवाह वाढण्याबरोबरच राष्ट्रीय स्तरावर बालविवाहातही घट झाली आहे. हार्वर्ड विद्यापीठातील संशोधन अधिकारी आणि भारत सरकारशी संबंधित अधिकाऱ्यांचाही या संशोधन पथकात समावेश होता.

१९९३ मध्ये बालविवाहाला बळी पडलेल्या मुलींची संख्या ४९ टक्के होती. २८ वर्षांनंतर म्हणजेच २०२१ मध्ये ते २२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. राष्ट्रीय स्तरावरही मुलामुलींचे बालविवाह लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहेत. २००६ मध्ये सात टक्के मुलांची लग्ने होत होती, ती २०२१ मध्ये दोन टक्क्यांवर आली आहेत. तथापि, संशोधन पथकाने यावर चिंता व्यक्त केली आणि सांगितले की, २०१६ ते २०२१ या कालावधीत बालविवाह बंद करण्याची प्रगती थांबली आहे. २००६ ते २०१६ या कालावधीत बालविवाहात सर्वाधिक घट नोंदवली गेली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR