नाशिक : सातपूर परिसरातील अशोकनगरमध्ये भांडी पॉलिश करण्याचे काम करणा-या दोघांनी ६० वर्षीय महिलेचे १ लाख ५३ हजारांचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दर्शना सुरेश गोयल (रा. मॉडर्न स्कूलच्या मागे, अशोकनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता. १५) सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास ३५ ते ४५ वयोगटातील भांडे पॉलिश करण्याचे काम करणारे दोन अज्ञात इसम आले होते.
त्यांनी परिसरातील काही ग्राहकांची भांडी पॉलिश करून दिली. श्रीमती गोयल यांचीही भांडी पॉलिश केली. त्यावेळी संशयितांनी त्यांना, तुमच्याकडे सोने असेल तर तेही पॉलिश करून देतो असे म्हणून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांनीही घरातील १ लाख ५३ हजार ३०० रुपयांचे विविध प्रकारे सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्यासाठी दोघा संशयितांकडे दिले. संशयितांनी ते दागिने पॉलिशच्या बहाण्याने घेऊन श्रीमती गोयल यांची नजर चुकवून हातचलाखीने काढून घेतले आणि त्यानंतर बंद भांडे त्यांच्याकडे देत थोड्या वेळाने उघडण्यास सांगितले. त्यानंतर संशयित पसार झाले.
श्रीमती गोयल यांनी ते भांडे उघडून पाहिले असता त्यात दागिने नव्हते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सातपूर पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्यानुसार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक राजू पठाण हे तपास करीत आहेत.