जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. अशातच आज (मंगळवार, ३१ ऑक्टोबर) कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांनी अंतरवाली सराटीत उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यावेळी शाहू महाराजांना शब्द देत, राजांचा मान राखून दोन दिवस पाणी पिणार, दोन दिवसांत आरक्षण मिळाले नाहीतर पुन्हा पाणी सोडणार, असे म्हटले आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना श्रीमंत शाहू महाराजांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. छत्रपती घराण्यातील माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेतल्यानंतर आज कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांनी मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी शाहू महाराजांनी सरकारला आपला शब्द ऐकावाच लागेल, असे स्पष्टच सांगितले. तसेच, तब्येतीची काळजी घेण्याची विनंती मनोज जरांगेंना शाहू महाराजांनी केली.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपतींनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंशी फोनवरून चर्चा केली. तसेच, जरांगेंच्या तब्येतीची संभाजीराजेंनी चौकशीही केली. मनोज जरांगेंनी निदान पाणी तरी घ्यावे अशी विनंतीही संभाजीराजे छत्रपतींनी केली. तसेच, काळजी घेण्याचेही आवाहन संभाजीराजेंनी केले. यापूर्वी अंतरवाली सराटीत जात संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली होती.