नवी दिल्ली : लोकसभेच्या सुरक्षा भंगामुळे देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाल्याने दोन्ही सभागृहाचे कामकाजही विस्कळीत झाले आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांनी संसदेत गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडे उत्तरे मागितली आहेत. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांना पत्र लिहिले आहे. लोकसभेच्या सुरक्षा भंगाची चौकशी उच्चस्तरीय समिती करणार असल्याची माहिती त्यांनी खासदारांना दिली आहे.
तसेच गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत झाल्याबद्दल लोकसभा अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली. सभागृह सुरळीत चालण्यासाठी सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी खासदारांना सांगितले. ओम बिर्ला म्हणाले की, त्यांनी स्वतः संसदीय संकुलाच्या सुरक्षेसाठी उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे. बिर्ला म्हणाले की, ही समिती संपूर्ण संसद संकुलाच्या सुरक्षेशी संबंधित विविध पैलूंचा आढावा घेईल. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी समिती अशा ठोस उपाययोजना व आराखडा तयार करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
लोकसभेत संसदेच्या कामकाजादरम्यान सुरक्षेतील गंभीर त्रुट समोर आली होती. या प्रकरणी १३ डिसेंबरलाही मोठा गदारोळ झाला होता. दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनीही पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री शाह यांच्या वक्तव्याची मागणी करत गोंधळ घातला. असभ्य वर्तनाच्या आरोपावरून विरोधी पक्षांच्या १४ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. सरकार आवाज दाबत असून जबाबदारीपासून पळ काढत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत.
भाजप खासदारावर कारवाईची मागणी
गेल्या १३ डिसेंबरला संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला २२ वी वर्ष पूर्ण झाली होती. त्याच दिवशी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून अचानक संसदेत उड्या मारल्या. कर्नाटकमधून निवडून आलेले भाजप खासदार प्रताप सिम्हा यांचेही नाव या प्रकरणात चर्चेत आहे. व्हिजिटर पासवर प्रताप सिम्हा यांचे नाव लिहिलेले असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षाचे खासदार करत आहेत.