जयपूर : राजस्थानमध्ये सरकार बदलताच प्रशासकीय बदलही सुरु झाले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या टीममध्ये समाविष्ट असलेल्या चार आयएएस अधिकाऱ्यांना सीएमओमधून हटवून एपीओ करण्यात आले आहे. यापैकी अशोक गेहलोत यांचे प्रधान सचिव कुलदीप रांका, आयएएस गौरव गोयल, आयएएस आरती डोगरा आणि आयएएस विशाल राजन यांना पुढील आदेशापर्यंत एपीओ करण्यात आले आहे. तसेच राजस्थान प्रशासकीय सेवेतील अधिकारी योगेश श्रीवास्तव यांची मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचे ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शुक्रवारी राजस्थानचे नवनियुक्त मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर लगेचच राज्याच्या नोकरशाहीत बदल सुरू झाले. सर्वप्रथम मुख्यमंत्री कार्यालयातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी कार्मिक विभागाकडून तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या अंतर्गत वरिष्ठ आयएएस टी रविकांत यांना मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, आयएएस अधिकारी आनंदी यांना सचिव आणि सौम्या झा यांना सहसचिव बनवण्यात आले आहे.
आरएएस अधिकारी योगेश श्रीवास्तव लोकसभेत उपसचिव म्हणून कार्यरत होते. दिल्लीहून राजस्थानला परतताच त्यांना नवीन सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. याशिवाय मेडिकल आणि यूडीएचची जबाबदारी सांभाळणारे टी रविकांत यांची मुख्यमंत्र्यांचे हंगामी प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. टी रविकांत हे राजस्थानच्या नोकरशाहीत स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखले जातात. १९९८ च्या बॅचचे आयएएस टी रविकांत हे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांचे सचिवही राहिले आहेत.