कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न हा तणावाचा आहे. अशातच आता कर्नाटकातून महाराष्ट्रात येणा-या सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत ही बससेवा बंद राहणार आहे. महाराष्ट्रात सध्या मराठा आंदोलन तीव्र झाले आहे. ठिकठिकाणी जाळपोळ झाल्याच्या घटना समोर येत आहेत. बसेस जाळल्या जात आहेत.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कर्नाटकच्या बसेस टार्गेट केल्या जात असल्याने कर्नाटकच्या परिवहन महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. आमदार प्रकाश सोळंके आणि जयदत्त क्षीरसागर यांची घरे पेटवली गेली. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. बसेस जाळण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर आता कर्नाटक सरकारने आपल्या बसेस महाराष्ट्रात न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात प्रवेशबंदी
महाराष्ट्रातील तीन मंत्री आणि खासदारांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. आज (३१ ऑक्टोबर) सकाळी दहा वाजल्यापासून ते २ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत ही प्रवेशबंदी असणार आहे. तसा आदेश कर्नाटक सरकारकडून जारी करण्यात आला आहे. १ नोव्हेंबरला महाराष्ट्र एकीकरण समिती काळा दिन पाळणार आहे. या दिवशी रॅलीही काढली जाणार आहे. त्यानंतर मराठा मंदिर येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.