त्रिपोली : लीबियाच्या समुद्रामध्ये स्थलांतरितांना नेणारे एक जहाज बुडून भीषण दुर्घटना झाली आहे. या जहाजामध्ये असणा-या सुमारे ६१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने याबाबत माहिती दिली आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतून बचावलेल्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या निश्चित केली आहे. हे जहाज सुमारे ८६ स्थलांतरितांना घेऊन लीबियाच्या जवारा शहरातून निघाले होते. ते समुद्रमार्गे युरोपात जाण्याचा प्रयत्न करत होते. लीबियामध्ये २०११ साली नाटो समर्थित विद्रोह झाल्यानंतर प्रचंड अस्थिरता आहे. यामुळे कित्येक लोक हा देश सोडून युरोपात जाण्याचा प्रयत्न करतात. या लोकांची तस्करी करण्यासाठी सैन्यांचे काही गट कार्यरत असतात.
लीबियाच्या काही किनारी भागावर याच गटांचे नियंत्रण आहे. यापूर्वी जून महिन्यात देखील अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती. स्थलांतरितांना घेऊन जाणा-या जहाजातील सुमारे ७९ प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला होता. या जहाजातील शेकडो लोक बेपत्ता झाले होते.