मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच १८ डिसेंबरपासून या प्रकरणातील अंतिम टप्प्यातील सुनावणी सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर तीन दिवस ही सुनावणी सुरू असणार आहे. यातील प्रत्येकी दीड-दीड दिवस शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांना युक्तिवाद करता येणार आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्यास मुभा दिली आहे. याआधी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती.
साधारणतः दीड वर्षांहून जास्त काळ महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात गटात सुरू असलेला आमदार अपात्रतेचा वाद आगामी वर्षाच्या सुरुवातीला निकाली निघणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील अंतिम सुनावणीला उद्या सुरुवात होणार आहे. उद्या सकाळी साडेआठ वाजता सकाळच्या सत्रातील अंतिम सुनावणीला सुरुवात होईल. तर दुपारी अध्यक्षांच्या कामकाजातील वेळेनुसार दुसऱ्या सत्रातील अंतिम सुनावणी होणार आहे. १८, १९ आणि २० डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी विधानसभा अध्यक्षांकडून पूर्ण केली जाणार आहे.
शिवसेना दोन्ही गटाची उलट तपासणी झाल्यानंतर आणि लेखी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोरील या प्रकरणातील सुनावणीचा हा शेवटचा टप्पा असणार आहे. यानंतर १० जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना या सगळ्या प्रकरणाचा निकाल देणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपेक्षित आहे.