नवी दिल्ली : दहशतवादविरोधी एजन्सी एनआयएने सोमवारी इसिस (आयएसआयएस) नेटवर्क प्रकरणी चार राज्यांमध्ये १९ ठिकाणी छापे टाकले. कर्नाटकात ११, झारखंडमध्ये चार, महाराष्ट्रात तीन आणि दिल्लीत एका ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. गेल्या आठवड्यात केंद्रीय दहशतवाद विरोधी संस्थेने महाराष्ट्रात ४० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आणि १५ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक इसिस मॉड्यूलचा म्होरक्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
छाप्यादरम्यान, एनआयएने मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड, शस्त्रे, तीक्ष्ण साधने, संवेदनशील कागदपत्रे आणि विविध डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. एनआयए अधिकार्यांनी सांगितले की, आरोपी ‘परदेशी मास्टर्स’च्या सूचनेनुसार भारतात काम करत होते आणि देशातील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी होते.
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) ही भारत सरकारने दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी स्थापन केलेली फेडरल तपास संस्था आहे. भारतातील दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास आणि खटला चालवण्यासाठी एनआयए स्वतंत्र आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर ३१ डिसेंबर २००८ रोजी एनआयएची स्थापना करण्यात आली. ही भारतातील सर्वात शक्तिशाली तपास संस्थांपैकी एक आहे आणि तिचे देशभरात कार्यालये आहेत.