13.8 C
Latur
Tuesday, November 18, 2025
Homeमहाराष्ट्रकाशीनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशाला स्थगिती

काशीनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशाला स्थगिती

विरोधकांची टीका सुरूच पालघर साधू हत्याकांडात आरोपींना साथ दिल्याचा होता आरोप

मुंबई : प्रतिनिधी
पालघर हत्याकांड प्रकरणातील साक्षीदार काशीनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशावरून विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काशीनाथ चौधरींच्या प्रवेशाला स्थगिती दिली आहे. पालघर जिल्हाध्यक्ष भारत राजपूत यांना याबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहे.

काशिनाथ चौधरी यांना पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून भाजपने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार असताना रान उठवले होते. हे प्रकरण सरकार दडपत असल्याचा आरोपही केला होता. मात्र याच प्रकरणातील साक्षीदार काशीनाथ चौधरी यांना भाजप प्रवेश दिल्याने विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडले होते. त्यामुळे चौधरी यांच्या प्रवेशाला स्थगिती देण्याची नामुष्की भाजपावर आली आहे. मात्र याबाबत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी बरीच सारवासारव केली. चौधरी यांना केवळ साक्षीसाठी बोलावले होते.

चौधरी यांचा सीबीआय अथवा सीआयडी यांनी केलेल्या तपासात कोठेही आरोपी म्हणून उल्लेख नाही. तपासातील अधिकृत नोंदींनुसार कोणत्याही प्राथमिक माहिती अहवालात किंवा आरोपपत्रामध्ये चौधरी यांचे नाव नाही. या सर्व माहितीची खातरजमा करून स्थानिक पातळीवर चौधरी यांना पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. पालघर साधू हत्याकांडातील दोषींना कठोर शासन व्हावे यासाठी भाजपने आग्रही भूमिका घेतली होती. त्यावेळी सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने या हत्याकांडातील आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केला होता.

पुरेशी चौकशी करून स्थानिक पातळीवर चौधरी यांच्या प्रवेशाचा निर्णय झाला. मात्र या प्रवेशानंतर समाज माध्यमांमध्ये तसेच प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा झाल्याने या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन चौधरी यांच्या प्रवेशाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बन यांनी स्पष्ट केले.

चौधरी रोहित पवारांसाठी दोषी
काशीनाथ चौधरी हे कालपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. राष्ट्रवादीमध्ये असताना रोहित पवार यांना चौधरी हे चांगले वाटत होते. त्यावेळी पालघर हत्याकांड प्रकरणाची चौकशी व्हावी, दोषींना शिक्षा व्हावी असे रोहित पवारांना वाटले नाही. मात्र शरद पवार गटाची राष्ट्रवादी सोडल्यावर रोहित पवार यांना एका रात्रीत काशीनाथ चौधरी दोषी कसे वाटू लागले? रोहित पवारांचा हा दुटप्पीपणा जनता सहन करणार नाही असा टोलाही बन यांनी लगावला.

राज ठाकरे यांना स्मृतीभ्रंश
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी राजकीय फायद्या-तोट्याची पर्वा केली नाही. त्यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे त्यांचा मताचा अधिकार काढून घेण्यात आला होता, याचा राज ठाकरेंना विसर पडला आहे. राज ठाकरेंची स्मरण शक्ती चांगली आहे, पण बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेबाबत त्यांना स्मृतीभ्रंश झाला असावा अशी शंका येते असेही बन म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR