मुंबई : २५२ कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून बुधवारी लोकप्रिय इन्फ्लूएन्सर कलाकार ओरहान अवतारमणी, ज्याला ओरी म्हणूनही ओळखले जाते, अंमली पदार्थ विरोधी पथकाने समन्स बजावले.
ओरीला गुरूवारी सकाळी १० वाजता घाटकोपर येथील एएनसी (अँटी नार्कोटिक्स सेल) कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असता तो कार्यालयात हजर झाला आहे. ड्रग्ज प्रकरणासंदर्भात त्याची तेथे चौकशी करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमसोबत काम करणा-या ड्रग्ज तस्कर सलीम डोलाचा मुलगा ताहेर डोला याचे ऑगस्टमध्ये दुबईहून अंमली पदार्थ विरोधी पथकाने प्रत्यार्पण केले होते.
चौकशीदरम्यान, ताहेर डोलाने त्याच्या जबाबात म्हटले आहे की, बॉलिवूड अभिनेते, मॉडेल, रॅपर्स, चित्रपट निर्माते आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नातेवाईकदेखील भारतात आणि परदेशात त्याच्याद्वारे आयोजित केलेल्या ड्रग्ज पार्ट्यांमध्ये सहभागी झाले होते. ताहेर डोलाने दावा केला आहे की या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज (मेफेड्रोन) पुरवठा केला जातो. या पार्टीत सहभागी झालेल्यांमध्ये श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धांत कपूर, अलिशा पारकर (हसीना पारकरचा मुलगा), नोरा फतेही, ओरी उर्फ ओरहान अवातारमनी, लोकप्रिय चित्रपट निर्माता जोडी अब्बास-मस्तान, रॅपर लोका आणि बाबा सिद्दिकीचा मुलगा झीशान सिद्दीकी यांचा समावेश होता.

