15.8 C
Latur
Friday, November 21, 2025
Homeमहाराष्ट्रमहायुतीत फाटाफूट!

महायुतीत फाटाफूट!

शिंदेविरोधात भाजप, भाजपविरोधात राष्ट्रवादीचे डाव-प्रतिडाव
मुंबई : प्रतिनिधी
एकीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सूत जुळत नसल्याचे चित्र असतानाच आता महायुतीतही सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. एकीकडे आपल्या पाठीशी दिल्लीची महाशक्ती असल्याचे सांगणा-या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात फोडाफोडीतून भाजपने खच्चीकरण सुरू केले आहे. याबद्दल नाराजी व्यक्त होऊनही शिंदेंना धक्के देणे सुरूच असून, भाजप पक्षश्रेष्ठींनीदेखील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पक्षविस्ताराचे काम सुरू ठेवा, असे सांगत एक प्रकारे शिंदेविरोधात भाजपला बळ दिले आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजप नेत्यांना विश्वासात न घेता मुंबईत नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व दिल्याने भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून, अशा स्थितीत आम्ही युती करू शकत नाही, असा थेट इशारा मंत्री आशिष शेलार यांनी दिला आहे. त्यामुळे महायुतीतही फाटाफुटीची चिन्हे आहेत.

राज्यात शिवसेनेचे नेते व पदाधिकारी पळवापळवीवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी फडणवीस यांनी तुम्हीच आधी सुरुवात केल्याचे सांगत जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्याचवेळी आता इथून महायुतीत फोडाफोडी होणार नाही, असेही ठरले होते. असे असतानाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी थेट दिल्ली गाठली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह फोडाफोडीसंबंधी भाजप नेत्यांबद्दल तक्रार केली. त्यावेळी अमित शाह यांनी यात आपण लक्ष घालू, असे आश्वासन दिले. मात्र, दुसरीकडे अमित शाह यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पक्षविस्ताराचे काम असेच सुरू ठेवा, असे सांगत त्यांची पाठराखणही केली. त्यामुळे शिंदे यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

आधीच एकीकडे निधीची अडचण असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शिंदेसेनेला जेरीस आणले आहे. शिंदेसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघातील माजी आमदार, शिंदेसेनेच्या आमदारांविरोधात लढलेले उमेदवार यांना चव्हाण भाजपकडे खेचून घेत आहेत. चव्हाण यांनी शिंदेंचा बालेकिल्लादेखील सोडलेला नाही. श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याणमध्ये चव्हाण यांनी शिंदेसेनेचेच माजी नगरसेवक फोडले. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेतील तणाव टोकाला गेला आहे. त्यात भाजप पक्षश्रेष्ठीने चव्हाण यांना पाठबळ दिल्याने शिंदे यांचीच कोंडी झाली आहे.

एकीकडे शिंदे यांची कोंडी झालेली असताना आता राष्ट्रवादीसोबतही कुरबुरी सुरू झाली. राष्ट्रवादीने भाजपच्या विरोधाला न जुमानता मुंबई महापालिका निवडणुकीचे नेतृत्व माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे दिले. त्यावरून आता भाजप-राष्ट्रवादीत वाद सुरू झाला. मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्यांना मुंबईतील निवडणुकीचे नेतृत्व देणे गैर आहे. तसे असेल तर भाजप राष्ट्रवादीसोबत युती करू शकत नाही, असा इशारा मंत्री तथा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला.

शिंदे सेनेला पुन्हा धक्का
जामनेर नगरपरिषद निवडणुकीत शिंदे सेनेच्या एबी फॉर्मसह अर्ज भरलेल्या वॉर्ड क्र. १ मधील मयुरी चव्हाण व वॉर्ड क्र. १३ मधील रेशंता सोनवणे या दोन महिला उमेदवारांना माघार घ्यायला लावून भाजपत प्रवेश दिला. त्यामुळे भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या या कृतीमुळे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

मलिकांकडे नेतृत्व
असल्यास युती नाही
राष्ट्रवादीने नवाब मलिक यांच्यावर मुंबईची धुरा सोपविली. परंतु भाजपने यावर आक्षेप घेतला असून, भाजप नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत. यावर आम्ही तडजोड करु शकत नाही. मुंबईत महायुतीत एनसीपी नसावी अशी आमची भूमिका आहे. त्यात नवाब मलिकांकडे नेतृत्व असेल तर आम्ही युती करू शकत नाहीत, असा थेट इशारा दिला आहे.

मलिक यांच्यावरच मुंबईची जबाबदारी
भाजपने भूमिका स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी नवाब मलिक हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर जबाबदारी दिली गेली आहे ती योग्यच आहे. कोण काय बोलते याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. एकमेकांवर टीका न करता आम्ही या निवडणुकांना पुढे जात आहोत, असे म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR