याआधी भोंगळ कारभार; मूलभूत सुविधांचा अभाव
रेणापूर (सिद्धार्थ चव्हाण) : रेणापूर नगर पंचायतीत पाणी, स्वच्छता, रस्ते, आरोग्य यासारख्या मूलभूत सोयी-सुविधांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणारे आणि प्रत्यक्ष काम करणारे नगरसेवक हवे असल्याचे मत ‘एकमत’च्या ग्राऊंड रिपोर्टमध्ये रेणापूरमधील नागरिकांनी मांडले. सध्या रेणापूर नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. त्यानिमित्ताने ‘एकमत’ने हा ग्राऊंड रिपोर्ट घेतला. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी या अगोदरच्या सत्ताधा-यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या अगोदर रेणापूर पंचायतीवर भाजपची सत्ता होती.
सध्या रेणापूर नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगरपंचायतीच्या भावी नगरसेवकांकडून नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत, मागच्या काळात विकासाची कामे झाली आहेत का, येणा-या काळात कोणती कामे होणे अपेक्षित आहे. यासाठी रेणापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या.
यावेळी स्थानिक नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या. रेणापूर नगरपंचायतीत मागच्या काळात भोंगळ कारभार पाहायला मिळाला. येथे कचरा डेपो नाही, सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा नाहीत, पाणी पुरवठा १५ दिवसांनी एकदा होतो. नाल्याचे कामही व्यवस्थित नाही. त्यामुळे शहराचा विकास नाही, तर शहर भकास झाले आहे. शहरात शौचालये उभारणीचे बिल उचलले. परंतु शौचालय कुठेच दिसत नाही. बाजारपेठ परिसरातही स्वच्छता गृह नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. बैल बाजारातही सुविधा नाही. रेणापूर लातूर शहरापासून जवळ आहे. परंतु म्हणाव्या तशा सुविधा नाहीत, अशी खंतही उपस्थितांनी व्यक्त केली. रेणापूरच्या बैलबाजाराचा परिसरात नावलौकिक आहे. परंतु इथेही सुविधा नाहीत.
नागरिकांनी पाणी पुरवठ्याच्या योजनेचे काम झाल्याचे सांगितले. पण मुळात ही पाणी पुरवठ्याची योजना ही महाविकास आघाडीच्या काळात माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नाने मिळाली. महात्मा गांधींच्या पुतळा सुशोभीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. रस्ता, नाली, दिवाबत्तीसह रेणापूर शहराच्या मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवणारे प्रतिनिधी निवडण्याची गरज व्यक्त केली.
विकास फक्त कागदावरच झाला
रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत मागच्या वेळी जे निवडून आले. ते सत्ताधारी रेणापूरचा विकास केल्याचा दावा करीत आहेत. परंतु रेणापूरचा विकास वास्तवात झाला नसून तो फक्त कागदावरच झाला आहे, असे रेणापूरमधील नागरिकांनी ‘एकमत’च्या विशेष कार्यक्रमात सांगितले. रेणापूरमधील कचरा, आरोग्याच्या सोयीसुविधा, रस्ते, नाली, पिण्याचे पाणी, वीज हे मूलभूत प्रश्न कायम आहेत. रेणापूरमध्ये बैलांचा बाजार भरतो. खुप लांबून व्यापारी या बाजारात येतात. परंतू, स्वच्छतागृहाअभावी या व्यापा-यांची हेळसांड होत आहे. शौचालय बांधले, बिलही उचलली आणि शौचालयच जागेवर नाही, अशी परिस्थिती आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहाअभावी महिलांचीही कुचंबना होत आहे.
१५ दिवसाला पाणीपुरवठा होतो. तोही अपुरा असतो. त्यामुळे पाण्यासठी भटकंती करावी लागते. मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. नगरविकास विभागाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आला. पण तो गेला कुठे?, कामे दर्जेदार झाली नाहीत, असा आरोपही नागरिकांनी केला. रेणापूर मोठे शहर आहे. त्यामुळे शहरात एमआयडीसी आली पाहिजे. विविध उद्योग उभे राहीले पाहिले. युवकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. नगरपंचायतीमार्फत दवाखाना, शाळा उभ्या राहिल्या पाहिजेत. नगरसेवक सामान्यांचा असावा, पक्षाचा गुलाम नसावा. नगरसेवक काम करणारा असा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

