मुंबई : प्रतिनिधी
ऐन थंडीच्या दिवसांमध्ये राज्यात अंड्यांचा तुटवडा निर्माण झाला असून, अंड्यांची किंमत प्रतिनग वधारली आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये कोंबड्यांना संसर्ग झाल्याने राज्यात दैनंदिन मागणीच्या तुलनेत अंड्यांचा पुरवठा निम्म्यावर आल्याचे व्यापा-यांनी सांगितले.
जिममध्ये जाणारे युवक आणि खवैय्ये सगळेच अंड्यांना प्राधान्य देतात. अशात हिवाळ्याची चाहूल लागताच अंड्यांचे दर वाढले आहेत. दरवर्षी थंडीत अंड्यांची मागणी वाढत आहे. काही अहवालांनुसार ग्राहकांचा कल मांसाहारापेक्षा अंडी सेवनाकडे अधिक असल्यामुळे मागणी वाढत आहे. दरम्यानच सांगितले जात आहे की ही दरवाढ काही महिने अशीच कायम राहणार आहे.
थंडीच्या वाढत्या कडाक्याने अंड्यांच्या दरात मोठी वाढ झाली असून ३०अंड्यांचा ट्रे १७० रुपयांवरून २०० ते २१९ रुपयाला झाल्याने अंडे खाणा-यांच्या खिशाला कात्री लागली आहे.
राज्यात दररोज तीन कोटी अंड्यांची मागणी असते. त्यात राज्यातील कुक्कुटपालक दीड कोटी अंड्यांची गरज भागवतात. उर्वरित अंड्यांची गरज इतर राज्यांतील कुक्कुटपालकांकडून भागवली जाते. गेल्या काही दिवसांत कुक्कुटपालनासाठी आवश्यक असणा-या खाद्यपदार्थांच्या किमतीही नियंत्रणात आहेत. मात्र तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून अंडी राज्यात येण्याचे प्रमाण कमी झाल्याने दर वाढू लागले आहेत. सध्या ठोक बाजारपेठेत अंड्यांचा दर ७ रुपये १० पैसे झाला असून किरकोळ बाजारात हे दर आठ रुपयांवर जाण्याची दाट शक्यता आहे.

