जी-२० परिषदेत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) गैरवापर रोखण्यासाठी जागतिक समझोता आवश्यक आहे. डीपफेक आणि दहशतवादातही एआयचा गैरवापर सुरू आहे. याबद्दल चिंता व्यक्त करीत तंत्रज्ञान हे अर्थकेंद्रीत नव्हे तर मानवी केंद्रीत असायला हवे. यातून जर त्याचा गैरवापर होत असेल तर तो रोखला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी भारत फेब्रुवारी २०२६ मध्ये एआय इम्पॅक्ट शिखर संमेलनाचे आयोजन करेल, असे म्हटले.
जी-२० शिखर संमेलनाच्या तिस-या सत्रात मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. डीपफेक आणि दहशतवादात एआयच्या वापरावर बंदी आणली पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर राष्ट्रीय ऐवजी वैश्विक पातळीवर झाला पाहिजे. तंत्रज्ञान आपल्या स्रोतांच्या आधारे विकसित झाले पाहिजे. एक मॉडेल म्हणून विकसित व्हायला नको, असे पंतप्रधान म्हणाले. हाच दृष्टिकोन ठेवून भारताने तंत्रज्ञान इकोसिस्टम बनविली आहे. याचे परिणाम सकारात्मक दिसून आले आहेत. मग ते अंतराळ क्षेत्रातील असतील किंवा एआय क्षेत्रातील असतील. एवढेच काय तर डिजिटल देवाण-घेवाणीच्या बाबतीतही भारत अग्रेसर आहे, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.
एआयच्या युगात आपण आपला दृष्टिकोन वेगाने बदलला पाहिजे. आपल्याला आजच्या नोक-यांपासून उद्याच्या क्षमतांवर विचार केला पाहिजे. नवआचरणासाठी प्रतिभेला गती देणे गरजेचे आहे. आम्ही दिल्ली जी-२० मध्ये हा मुद्दा मांडला होता. त्यामुळे पुढील काही वर्षांत जी-२० प्रतिभेला गती देण्यासाठी वैश्विक पातळीवर एक व्यवस्था विकसित केली जाईल, याचा मला विश्वास आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
एआय परिषदेचे आयोजन भारतात
एआय मिशनअंतर्गत सर्व लोकांपर्यंत एआय तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या उद्देशाने भारत फेब्रुवारी २०२६ मध्ये एआय परिषदेचे आयोजन करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय विषयावर एआय इम्पॅक्ट शिखर संमेलनाचे यजमानपद भारत भूषवेल, असे ते म्हणाले. यामध्ये जी-२० देशांनी सामिल व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

