नकाशा कधीही बदलू शकतो : राजनाथ सिंह
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत-पाकिस्तानची १९४७ मध्ये फाळणी झाली होती. त्यावेळी भारतीय संस्कृतीशी निगडीत असलेली अनेक ठिकाणे पाकिस्तानात गेली होती. यात सिंध प्रांताचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सिंधची भूमी कदाचित भारताचा भाग नसेल. परंतु सांस्कृतिक दृष्टिकोनातून सिंध नेहमीच भारताचा भाग राहील, असे म्हटले. तसेच त्यांनी सिंधचा भारतात समावेश करण्याबाबतही भाष्य केले.
राजधानी दिल्लीतील विज्ञान भवन येथे वर्ल्ड सिंधी हिंदू फाउंडेशन ऑफ असोसिएशनद्वारे आयोजित ‘स्ट्रॉंग सोसायटी : स्ट्रॉंग इंडिया’ कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, फाळणीनंतर सिंधू नदीजवळील सिंध प्रांत पाकिस्तानात गेला आणि त्या प्रदेशात राहणारे सिंधी लोक भारतात आले. या सिंध प्रांताचे भारतापासून वेगळे होणे हे लालकृष्ण अडवाणींसारख्या नेत्यांच्या पिढीने कधीही स्वीकारले नाही.
पुढे बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिले की, सिंधी हिंदू आणि आमच्या पिढीतील लोक अजूनही सिंधचे भारतापासून वेगळे होणे स्वीकारू शकलेले नाहीत. केवळ सिंधमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतातील हिंदू लोक सिंधू नदीला पवित्र मानत होते. सिंधमधील अनेक मुस्लिमांनाही असे वाटत होते की सिंधू नदीचे पाणी मक्केच्या झमझमच्या पाण्यापेक्षा कमी पवित्र नाही. राजनाथ सिंह यांनी फाळणीनंतर भारतातील सिंधी समुदायाची सुरुवात शून्यातून झाली. मात्र, त्यांनी नवीन उंची गाठली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात सिंधी समुदायाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे म्हटले.
सिंध भारतात परत
सामील होऊ शकते
सिंध आज भारताचा भाग नसला तरी संस्कृतीच्या दृष्टिकोनातून तो नेहमीच भारताचा भाग असेल आणि जमिनीच्या बाबतीत सीमा कधीही बदलू शकतात. काय माहित उद्या सिंध भारतात परत येऊ शकतो. सिंधू नदीला पवित्र मानणारे सिंधमधील आपले लोक नेहमीच भारताचे राहतील. ते कुठेही असले तरी ते नेहमीच आपले राहतील, असे राजनाथ सिंह म्हणाले.

