नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी, शशी थरूर, शिवसेनेच्या (युबीटी) प्रियांका चतुर्वेदी आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनी दावा केला आहे की, त्यांचे फोन हॅक केले जात आहेत. यावरून देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. राहुल गांधी यांनी पराकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर घणाघात केला आहे. यावर केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, अॅपलची अॅडव्हायजरी १५० देशांमध्ये जारी झाली आहे. केंद्र सरकार या विषयाबाबत चिंतेत आहे आणि या प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचेल.
तसेच विरोधी पक्षांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, देशात काही टीकाकार आहेत. या लोकांना देशाचा विकास दिसत नाही. कारण देशात त्यांच्या कुटुंबाची सत्ता असताना त्यांनी फक्त स्वतःचाच विचार केला. अॅपलने १५० देशांमध्ये ही सूचना जारी केली आहे. पत्रकार परिषदेत अश्विनी वैष्णव म्हणाले की, अॅपलकडून काही लोकांना अलर्ट मिळाला आहे, त्यासंदर्भात मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, केंद्र सरकार या विषयावर खूप गंभीर आहे. आम्ही या समस्येच्या तळापर्यंत पोहोचू. आम्ही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी करून आम्ही या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचू.”
विरोधकांवर निशाणा साधत अश्विनी वैष्णव म्हणाले की, मी तुमच्यासमोर आणखी एक विषय मांडू इच्छितो. आपल्या देशात असे काही टीकाकार आहेत ज्यांना टीका करण्याची सवय झाली आहे. त्यांची अवस्था अशी आहे की, जेव्हा ते जागे होतात सरकारवर शेवटपर्यंत टीका करतात. हे लोक देशाची प्रगती पचवू शकत नाहीत. कारण हे लोक जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी फक्त स्वतःचाच विचार केला. पोट कसे भरायचे याचाच विचार केला. या लोकांना देशाशी काही देणेघेणे नव्हते.