नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदाराची अनोखी युती पाहायला मिळाली. दिल्लीत आज रेल्वे कन्सल्टेटिव्ह कमिटीच्या बैठकीत राज्यातील खासदारांनी आवाज उठवला आणि यासंबंधी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले. खासदार संजय दीना पाटील, खा. नरेश म्हस्के आणि बाळ््यामामा म्हात्रे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना संयुक्तपणे निवेदन देत रेल्वेतील अधिका-यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
ट्रेनमध्ये शौचालय चांगले नसतात, आतमधल्या सुविधा वाईट असतात. रेल्वेच्या प्रवाशांना प्रचंड असुविधेला सामोरे जावे लागते अशा अनेक समस्या महाराष्ट्रातील खासदारांनी रेल्वेमंत्र्यांपुढे मांडल्या. रेल्वेचे अधिकारी त्यांच्या जबाबदारीवर धरून काम करीत नाहीत, मस्तवालपणे स्वत:च्या कार्यालयात बसून राहतात, प्रत्यक्ष रेल्वे स्थानकात, ट्रॅकवर उतरून काम करत नाहीत, खासदारांना कुठलीही माहिती देत नाहीत, असे या खासदार महोदयांनी आपल्या पत्रात म्हटले.

