नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरला झालेल्या कार ब्लास्टच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हल्ल्याचा मुख्य आरोपी डॉ. उमर याबद्दल मोठा खुलासा झाला आहे. तो एकीकडे इसिस ‘दाएश’ मॉड्यूलने प्रभावित होता, तर त्याचे इतर साथीदार अल-कायदा मॉड्यूल फॉलो करायचे. यामुळे त्यांच्यात वारंवार संघर्ष होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
तपासातील माहितीनुसार, हवाला मार्गे सुमारे २० लाख रुपये, तर एका जमात कडून ४० लाख रुपये गटाला मिळाले होते. या निधीचा वापर कसा करायचा, यावरूनही सतत वाद होत होते. ऑक्टोबरमध्ये अंतर्गत वाद सोडवण्यासाठी उमर काजीगुंड येथे गेला होता, परंतु काही साथीदारांच्या अटकेची माहिती मिळताच तो तातडीने परतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०१६ मध्ये हिज्बुल कमांडर बुरहान वानीला ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये झालेल्या प्रदर्शनात उमरने सक्रिय सहभाग घेतला होता. तो वानीच्या मृत्यूचा बदला घेण्याबाबतही बोलत असल्याची पुष्टी झाली आहे.
कलम ३७० हटल्यानंतर उमर बराच अस्वस्थ व चिडलेला होता. तपासात उघड झाले आहे की, २०२३ पासून तो आईडी तयार करण्याच्या तांत्रिक संशोधनात गुंतलेला होता. त्याने डॉ. आदिल अहमद राठर आणि डॉ. मुजम्मिल यांना या संदर्भात मार्गदर्शन केले. या काळात तो जैश-ए-मोहम्मदच्या सभा आणि भारत-विरोधी भाषणही ऐकत असल्याचे समोर आले आहे.

