निलंगा : लक्ष्मण पाटील
निलंगा नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोमात सुरू असताना सत्ताधा-यांच्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी लाईव्ह करीत शहरातील सुरू असलेल्या बँक कॉलनी रोडवरील अक्षरश: चिखलात व पाण्यात सुरू असलेल्या डांबरीकरण कामाचा पर्दाफास करत काम बंद केल्याने शहरातील झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी उलट सुलट चर्चेस उधाण आले आहे.
निलंगा नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत चांगलीच रंगत भरली असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीकरिता कंबर कसली आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून मतदारांना आपल्याकडे वळविण्याकरिता चढाओढ लागली आहे. सत्ताधारी भाजपपक्षाकडून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व अरविंद पाटील निलंगेकर हे शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी आणून शहराचा विकास केला असल्याचे सांगत विरोधकाकडून कोणतीच कामे केली नसल्याचा आरोप केला जात आहे तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके हे सत्ताधा-यांनी शहराच्या विकासासाठी निधी आणला मात्र शहरात निकृष्ट दर्जाची व बोगस कामे झाली असल्याने नेमका विकास कुणाचा झाला. हा संशोधनाचा विषय असल्याचा आमदार निलंगेकर यांच्यावर आरोप करीत शहरात झालेल्या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामाचा पाढा वाचला जात आहे. त्यातच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी बँक कॉलनी रोडवरील अक्षरश: रस्त्यावर माती व पाणी असतानाही डांबराचा पातळ लेयर देऊन निकृष्ट दर्जाचे पाण्यात डांबरीकरणाचे काम लाईव्ह करीत बंद पाडले.
शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर पाण्यात डांबरीकरणाचे सुरू असलेले काम लाईव्ह करून बंद करीत निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाचा पर्दाफास केल्याने शहरवासीयातून निकृष्ट दर्जाच्या कामा विषयी उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे शहरातील बँका कॉलनी हा रोड रहदारीचा आहे. कारण या रस्त्यावर मंगल कार्यालय, शाळा व महाविद्यालय असल्याने नागरिकासह शाळकरी मुलांची मोठी गर्दी असते. अशा प्रकारची शहरात निकृष्ट दर्जाची कामे करून बिले लाटण्याचा घाट घातल्याने शहरातील रस्त्याची अल्पावधीतच वाट लागत असते. यामुळे पुन्हा नागरिकांना खड्ड्यातून मार्गक्रमण करवे लागते. अशा प्रकारची शहरांमध्ये निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने शहराची वाट लागली असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके म्हणाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, शकील पटेल, अंबादास जाधव, अजित माने आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

